Wed, Jun 26, 2019 23:45होमपेज › Belgaon › ‘अन्नभाग्य’चे भ्रष्टाचार केंद्र हुक्केरीत

‘अन्नभाग्य’चे भ्रष्टाचार केंद्र हुक्केरीत

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:46PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

गुन्हे अन्वेषण पोलिस व अन्न व नागरीपुरवठ्याच्या अधिकार्‍यांनी  बुधवारी टिळकवाडीतील राईस मिलवर छापा टाकून अन्नभाग्य योजनेतील 100 क्विंटल तांदूळ जप्त केला. अन्नभाग्य तांदळाच्या भ्रष्टाचाराचे केंद्र हुक्केरीत असून कर्नाटकातील तांदुळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. बुधवारच्या छाप्यानंतर खात्याने सरकारी गोदामांच्या झाडाझडतीचे काम हाती घेतले आहे.

राज्य सरकारने गोरगरिबांसाठी ‘अन्नभाग्य’ अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना 1 रुपये दराने 14 किलो तांदूळ देण्याची योजना सुरु केली. मात्र योजना सुरुवातीपासूनच वादाचा मुद्दा बनली. काही वर्षात  योजनेतील तांदळाची बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या.

खात्याकडून प्रत्येक रेशनदुकानदाराला ठरवलेल्या कोट्याप्रमाणे महिन्याला धान्याचा पुरवठा केला जातो. रेशन दुकानात धान्य केव्हा येते, त्याचे केव्हा वाटप होते हा नेहमीच संशोधनाचा विषय आहे. रेशन दुकानदार, अधिकारी व श्रीमंत उद्योजकांच्या संगनमताने गरिबांचा तांदूळ दुप्पट रकमेला विकला जातो, याची नेहमीच चर्चा होते.

टिळकवाडी तिसर्‍या रेल्वेगेटजवळील राजशेखर चोण्णद यांच्या मालकीच्या ओम ब्रँड राईस मिलवर बुधवारी छापा टाकण्यात आला. 100 क्विंटल तांदूळ आणि 100 क्विंटलपेक्षा अधिक भात जप्त करण्यात आलेे. शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेले भात मिलमध्ये आणून त्याचे तांदूळ केले जातात. अन्नधान्य योजनेतील तांदूळ पॉलिश करून ते शेतकर्‍यांच्या तांदळात मिसळले जात होते. हा प्रकार अनेक वर्षापासुन सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी निपाणी येथे व त्यानंतर कोगनोळी चेक पोस्ट जवळ अन्नभाग्य तांदळाचा  साठा जप्त केला होता. चार वर्षापुर्वी खासबाग येथील राईस मिलवरील छाप्यात हा तांदूळ अन्य तांदळात मिसळून परगावी पाठवला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले. अलीकडच्या अन्नभाग्य तांदुळ भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असताना त्यामध्ये हुक्केरीचे नाव पुढे येत होते. बुधवारच्या छापा प्रकरणी जप्त आलेला अन्नभाग्य तांदुळ हुक्केरी ग्रामीण भागातील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कर्नाटकातील अन्नभाग्य योजनेतील तांदळावर प्रक्रिया करून तो जादा दराने महाराष्ट्रात विक्री केली जाते.  गोदामातील स्टॉकबाबतची चौकशी चालविली आहे.