होमपेज › Belgaon › प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणार

प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणार

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 10:27PMखानापूर : प्रतिनिधी

वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकर्‍यांना जगणे नकोसे झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळेही बळीराजा त्रस्त झाला आहे. अत्यल्प मिळणारी भरपाई वाढून देण्याकडे वनखाते दुर्लक्ष करत आहे. शाळांचे विलिनीकरण करुन मराठी शाळांना संपविण्याचा घाट शिक्षणखात्याने घातला आहे. या सर्व समस्यांविरोधात जनतेच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.

तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारकाच्या व्ही. वाय. चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. यावेळी वीज पुरवठा, रस्ते, शिक्षकांची कमतरता, थकित ऊसबिल व शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करुन त्यांच्या निवारणार्थ पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत म्हणाले, मराठी शाळांना पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे गुणवत्तेवर परिणाम होत असून त्वरित शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. मराठी शाळांचे विलिनीकरण करण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. 

आबासाहेब दळवी म्हणाले, खानापूर तालुक्यात विरळ लोकवस्ती आहे. त्याशिवाय दुर्गम भागात दळण-वळणाची सोय नाही. अशा परिस्थितीत शाळांचे विलिनीकरण झाल्यास मराठी माध्यमाच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून डावलल्यासारखे होणार आहे. एकाही शाळेचे विलिनीकरण केल्यास मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत.विवेक गिरी यांनी बेळगावला जाणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसप्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. यशवंत बिर्जे म्हणाले, तालुक्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला तोडीसतोड विरोधक म्हणून म. ए. समिती जनतेच्या प्रश्‍नांचे नेतृत्व करेल. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, रूक्माण्णा जुंजवाडकर  प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, नारायण लाड, अमृत पाटील, मुरलीधर पाटील, अविनाश पाटील, नारायण कापोलकर यांची भाषणे झाली.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना दिगंबर पाटील यांनी संबंधित खात्याच्या सर्व अधिकार्‍यांचे समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येईल, असे सांगितले.प्रारंभी छायादेवी पाटील (नंदगड), रुपादेवी पाटील, नानू सावंत, यल्लू सावंत (माळअंकले), आण्णापा गोरे, मल्लू पाटील (गर्लगुंजी), अजीम तेलगी (खानापूर), रेणुका पाटील (कुप्पटगिरी), हिराबाई पाटील (निडगल), कृष्णा पाटील, लक्ष्मण पाटील (मणतुर्गा), गणपती पाटील (कौंदल) आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी ता. पं. सदस्य महादेव घाडी यांनी आभार मानले.