होमपेज › Belgaon › महापौरांच्या वॉर्डात डेंग्यू नियंत्रणासाठी फॉगिंग

महापौरांच्या वॉर्डात डेंग्यू नियंत्रणासाठी फॉगिंग

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 14 2018 12:54AMबेळगाव : प्रतिनिधी

वडगावात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरल्यानंतर महापौरांच्या वॉर्डातही दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी प्रसिद्ध करताच शुक्रवारीच परिसरात महापालिकेने फॉगिंग केले. तर प्रभागात स्वच्छता, गटारी बांधकाम, पिण्याचे पाणी या मुलभूत गरजा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांनी ‘पुढारी’ला दिली. 

यमनापूरमधील मराठा कॉलनी व शास्त्रनगरमध्ये दोन डेंग्यू रुग्ण आढळले असून ते बेळगावातील खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. दोन्ही वसाहतींमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. प्रभागात गटारी नसल्याने  ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे डांसाची पैदास वाढली आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे फवारणी यंत्रातून संपूर्ण वॉर्डात फॉगिंग करण्यात आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची गरज असून त्यासाठी 22 लाखांचा निधी मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे, अशी माहितीही महापौर चिकलदिनी यांनी दिली. तसेच शुक्रवारी आरोग्य स्थायी समितीची बैठकही अध्यक्षा सुधा भातकांडे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत झाली. त्या बैठकीतही शहराती डेंग्यू आणि चिकुनगिनिया साथीवर नियंत्रण  ठेवण्याची सूचना आरोग्याधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा यांना देण्यात आली.