होमपेज › Belgaon › मालवाहू वाहनचालकास हेल्मेटची नोटीस !

मालवाहू वाहनचालकास हेल्मेटची नोटीस !

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:28PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरात दुचाकीचालकांना हेल्मेटसक्‍ती करण्यात आली आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी करताना मालवाहू वाहनचालकालाही हेल्मेट धारण न केल्याबद्दल दंडाची नोटीस पाठविण्याचा प्रकार घडला आहे. 

दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्‍ती करत शहर पोलिसांनी या नियमाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट स्थापन केले आहे. शहराच्या विविध भागात प्रामुख्याने चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतूक नियमभंग करणार्‍यांना दंड भरण्याच्या नोटिसा पाठविण्याचे सत्र सुरु ठेवले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दुचाकीस्वार आणि मागे बसणार्‍यास हेल्मेटसक्‍तीचा आदेश जारी केल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी शहर पोलिसांनी सुरु केली आहे, असे असले तरी शहर पोलिसांनी दुचाकीवर मागे बसणार्‍याला हेल्मेटसक्‍ती अजूनही लागू केलेली नाही. 

यापुढेही जाऊन पोलिसानी ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ हा नियमही जारी केला आहे. हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे हा नियम जारी करण्यात आला आहे. आता आश्‍चर्य म्हणजे पोलिसांनी चक्‍क मालवाहू वाहनचालकालाही हेल्मेटसाठी दंड ठोठावला आहे. रामनगर येथील रहिवासी बशीर अहमद मुराशल यांनी ही नोटीस बजाविण्यात आल्याने ते आश्‍चर्यचकित झाले आहेत.