Sun, Aug 25, 2019 03:40होमपेज › Belgaon › प्रथम मस्तकाभिषेक अपूर्व उत्साहात

प्रथम मस्तकाभिषेक अपूर्व उत्साहात

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMबंगळूर : प्रतिनिधी

जैन काशी म्हणून जगभरात विख्यात असणार्‍या श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथील या शतकातील द्वितीय महामस्तकाभिषेकाच्या धार्मिक विधीतील प्रथम मस्तकाभिषेकाला शनिवारी अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. देश-विदेशातून लाखो भाविकांनी हा अपूर्व योग साधत उपस्थिती दर्शविली.

भगवान बाहुबली यांचा 88 वा महामस्तकाभिषेक प्रथम मस्तकाभिषेकाला कळसाभिषेकांनी सुरुवात झाली. यावेळी बाहुबली वर्धमान सागर महाराज, जैन महामुनी, आचार्य यांच्या हस्ते धार्मिक विधींना प्रारंभ झाला.

विंध्यगिरीपर्वत 12 वर्षांतून येणार्‍या या क्षणाचा साक्षी होण्यासाठी उपस्थित राहिलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी भाविकांकडून ‘बाहुबली की जय’च्या गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या.

जगाला शांतीचा संदेश देणार्‍या भगवान बाहुबली मूर्तीची उभारणी व पहिला महामस्तकाभिषेक 13 मार्च 981 मध्ये राजा गंग यांचा प्रधानमंत्री चामुंडेराय यांनी केला. त्यावेळेपासून आतापर्यंत 87 मस्तकाभिषेक झाले आहेत. यावेळी 21 व्या शतकातील दुसरा, तर एकूण 88 वा महामस्तकाभिषेक होत आहे.

दुपारी 12 वाजता जलाभिषेक झाला. त्यानंतर नारळाच्या पाण्याचा अभिषेक, उसाच्या रसाचा अभिषेक, दुग्धाभिषेक, हळद, कंदमुळे, प्रथम कलश, द्वितीय कलश, तृतीय कलश, चतुर्थी कलश, चंदन, अष्टगंध, तांदळाचे पीठ, केसर, सोने, चांदी, फुले, पर्ण, पूर्णकुंभ यांचा अभिषेक घालण्यात आला.