Fri, Aug 23, 2019 23:34होमपेज › Belgaon › संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिले रक्त सीमावासीयांचे

संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिले रक्त सीमावासीयांचे

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:46PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी  

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगाव सीमाभागातील हुतात्म्यांनी दिले. मात्र, केंद्राची बोटचेपी भूमिका आणि महाराष्ट्राचा नाकर्तेपणा, यामुळे सीमावासीय कात्रीत सापडले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सीमावासीयांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून महाराष्ट्राने त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त हाक हुतात्मादिनी बुधवारी सीमानेत्यांनी दिली. 

17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना बेळगाव, कंग्राळी, खानापूर आणि निपाणीत अभिवादन झाले. प्रत्येक ठिकाणी हुतात्म्यांचे स्मरण करताना एकीची हाकही नेत्यांनी दिली. 

कर्नाटक पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये पै. मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, निपाणी येथील कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांना बेळगावातील हुतात्मा चौकात अभिवादन झाले. कार्यकर्त्यांनी ‘हुतात्मे अमर रहे’ घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

अभिवादनानंतर बोलताना वसंतराव मुळीक म्हणाले,  सीमालढ्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी अत्याचार सहन केले, तरीही या भागातील मराठी जनता सनदशीर मार्गाने लढा देत आहे.कोर्टाचा निर्णय लागेल; पण त्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी कोल्हापुरात मंत्रिमंडळाची बैठक बोलवावी. 

इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, केवळ बेळगाव सीमाभागातच नाही, तर शिवकाळापासून मराठी लोक कर्नाटकात वास्तव्य करून आहेत. मराठी जनता अविरत लढा देत असताना, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राने सीमाप्रश्‍नी बैठक घेतली नाही. या सीमालढ्यातील सीमावासीयांच्या त्यागाची महाराष्ट्राला माहिती आहे.त्यामुळे सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राने झोपेचे सोंग घेऊ नये. शासन न्याय देत नसल्यास प्रसंगी रायगडावरून आंदोलन आखावे लागेल.

शेकापचे संभाजी जगदाळे यांनी न्यायदेवतेच्या मंदिरात सीमावासीयांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. आ. संभाजी पाटील म्हणाले, मराठी भाषिकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले.सीमा प्रश्‍नाच्या लढ्यात मुंबईला केंद्रस्थानी मानून केंद्राला जाग आणावी लागेल. मराठी भाषिकांतील एकी काळाची गरज आहे.

महापौर संज्यात बांदेकर, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांनीही विचार मांडले. अभिवादनानंतर शहरातील बाजारपेठेतून फेरी काढली गेली.