Thu, Apr 25, 2019 21:22होमपेज › Belgaon › गौरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

गौरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:32AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी विचारवंत आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आठ महिन्यांनंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता के. टी. नवीनकुमार याच्याविरुद्ध बुधवारी 650 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तर लंकेश प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून आणि कन्‍नड साहित्यिक के. एस. भगवान यांना खुनाची धमकी दिल्यावरून आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.

मनोहर येडवे (वय 30, विजापूर कर्नाटक), सुजितकुमार ऊर्फ प्रवीण (37, मंगळूर), अमोल काळे ऊर्फ भाईसाब (40, महाराष्ट्र) आणि अमित देग्वेकर (गोवा) ऊर्फ प्रदीप अशी अटकेतील चौैघा संशयितांची नावे आहेत. ते सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत.

हिंदुत्वाविरोधी नेहमीच परखड मत मांडणारे आणि पुरोगामी विचारांचे साहित्यिक के. एस. भगवान यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या चौघांवर आहे. पुरोगामी विचारवंत लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी हत्या झाली होती. ‘कलबुर्गीनंतर आता तुमचा नंबर’ अशा आशयाचे पत्र पाठवून भगवान यांना धमकावण्यात आले होते.

नवीनकुमारविरोधात भादंवि 302 (खून), 120 बी (खुनाचा कट रचणे), 118 (गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करणे) तसेच कलम 114 आणि शस्त्र कायदा अंतर्गत संशयितावर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. यामध्ये 131 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. शिवाय आगामी काळात आणखी काही पुरावे आणि साक्षी सादर केल्या जाणार आहेत.गौरी लंकेश (वय 55) यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लाखो मोबाईल कॉल्स तपासल्यानंतर संशयित के. टी. नवीनकुमार सापडला. हत्या करण्यात आलेल्या दिवशी परिसरातील सीसी टीव्ही फुटेजवरून त्याची ओळख पटली. उप्पारपेठ पोलिसांनी 18 फेब्रुवारीला त्याला अटक केली.

संशयित नवीनकुमार हा मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथील राहणारा आहे. बंगळूर मॅजेस्टिक बसस्थानकात पिस्तूल आणि काडतुसांसह तो ग्राहकाच्या प्रतीक्षेत होता. शिवाय त्याने गौरी लंकेश यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याबाबतची माहिती मारेकर्‍यांना दिल्याचा आरोप आहे.

असे अडकले चौघे

अटकेतील नवीनकुमार याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सुजीतकुमार ऊर्फ प्रवीणच्या मागावर होते. 20 मे रोजी उप्पारपेठ पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याविरूद्ध शस्त्र नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या दिवशी एकजण मोटारसायकलीवर असल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तो प्रवीणच असावा या संशयावरून एसआयटीने त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर आणखी तिघा संशयितांची नावे बाहेर पडली. प्रवीणच्या माहितीवरून उप्पारपेठ पोलिसांनी आणखी तिघा संशयितांना 21 मे रोजी अटक केली. चौकशीवेळी या चौघांनी मिळून के. एस. भगवान यांच्या खुनाचा कट आखल्याची माहिती उघडकीस आली.