Thu, Apr 25, 2019 17:45होमपेज › Belgaon › उमेदवारांचे शक्‍तिप्रदर्शन

उमेदवारांचे शक्‍तिप्रदर्शन

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 1:00AMबेळगाव : प्रतिनिधी

भगवे फेटे, हिरव्या टोप्या, निळे मफलर आणि कुंकूम तिलक...वाढती उष्णता आणि रस्ते बंद...पोलिसांचे बॅरिकेड आणि उघड्या जीप...अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वाधिक गर्दी बेळगाव शहरात झाली होती. त्यापाठोपाठ चिक्‍कोडी आणि खानापुरात गर्दी होती. जिल्ह्यात सोमवारी एकूण 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे सोमवार हा उमेदवारी अर्जवार ठरला. मंगळवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

म. ए. समिती, सत्ताधारी काँग्रेस, भाजप, निजद यांच्यासह काही अपक्षांनीही सोमवारीच अर्ज भरले. काही अपक्ष वगळता सार्‍याच उमेदवारांनी शक्‍तिप्रदर्शन केले. मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबरच महिला आणि दुसर्‍या मतदारसंघातील नेतेही मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.

ग्रामीण मतदारसंघातून तालुका म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांनी अर्ज दाखल केला. ता. म. ए. समिती कार्यालयापासून मिरवणूक काढली.धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ता. म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी, आर. आय. पाटील  यांनी केले. त्यानंतर किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, संयुक्‍त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्लीमार्गे तहसीलदार कार्यालयात तर भाजपने सोमवारचा मुहूर्त साधत जोरदार शक्‍तिप्रदर्शन करत बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारांचा अर्ज   दाखल केला. राणी चन्‍नम्मा चौकातील गणेश मंदिरात खा. सुरेश अंगडी यांच्या हस्ते पूजन केले.

त्यानंतर बेळगाव उत्तरचे उमेदवार अनिल बेनके, दक्षिणचे उमेदवार अभय पाटील व ग्रामीणचे उमेदवार संजय पाटील यांचे अर्ज दाखल केले. दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अर्ज महानगरपालिका कार्यालय आवारात अर्ज दाखल केले. तर ग्रामीणचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आला. कार्यकर्त्यांनी भाजप विजयाच्या जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार फिरोज सेठ यांनीदेखील जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. सिव्हिल हॉस्पिटलसमोरील कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भगवा, निळे आणि हिरवे फेटे परिधान केलेले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

खानापुरात आठ अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अपेक्षेप्रमाणे सर्वाधीक आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह म. ए. समितीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केल्याने समर्थक व कार्यकर्त्यांचे गर्दीने अवघ्या शहराला जत्रेचे स्वरुप आले होते. मिनीविधान सौध परिसरात तर पाऊल ठेवण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. परिणामी बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतुकीत वारंवार अडथळा निर्माण झाला.

शनिवारपर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर सोमवारी निजदचे नासीर बागवान, भाजपचे विठ्ठल हलगेकर, म. ए. समितीकडून आ. अरविंद पाटील, माजी जि. पं सदस्य विलास बेळगावकर यांच्यासह माजी सभापती सुरेश देसाई, साईकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील, भुविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, उद्धोजक उत्तम बापशेट यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, File nominations,