होमपेज › Belgaon › नारायण गौडावर गुन्हा दाखल करा

नारायण गौडावर गुन्हा दाखल करा

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:59PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

करवेचा तथाकथित म्होरक्या नारायण गौडा याने छ. शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक विधान केले असून त्यामुळे समाजात वैमनस्य वाढण्याची शक्यता आहे. या विधानाचे पडसाद सीमाभागाबरोबरच महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोड कारवाई करावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली.
या मागणीचे निवेदन सोमवारी निवासी जिल्हाधिकारी डॉ. सुरेशकुमार इटनाळ यांना अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

छ. शिवाजी महाराज हे सार्‍या भारतीयांच्या श्रद्धेचे व अभिमानाचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी परकीय राजवटीपासून भारतीयांना वाचवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मुस्लिम राजवटी, इंग्रज व इतर परकीय राजवटींची आक्रमणे थोपविली. भारतीयांच्या मनात स्वतंत्रतेचे बीज पेरण्याचे काम त्यांनी केले. हे करित असताना कोणत्याही प्रकारचा भेदाभेद त्यांनी केला नाही. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सामावून घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. असे असताना नारायणगौडासारखी माणसे महाराजांविरुद्ध अवमानकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करीत आहेत. अशा व्यक्तीविरोधात राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

नारायणगौडाच्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद कर्नाटक व महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊन त्याच्यावर त्वरित कारवाई करावी. अन्यथा त्याचे पडसाद उमटल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला.

या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी डॉ. सुरेशकुमार इटनाळ यांनी स्वीकारले. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
दीपक दळवी यांनी नारायणगौडाच्या वक्तव्यामुळे तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून शिवप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता असून वेळीच कारवाईची मागणी केली. 
निवेदन पोलिस आयुक्‍तानाही सादर करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, आ. अरविंद पाटील, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, जयराम मिरजकर, आर. आय. पाटील,  सुरेश राजुकर, बाबुराव पिंगट, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, चेतक कांबळे, जगनाथ बिर्जे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, राजू मरवे,  अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, मारुती परमेकर उपस्थित होते. 

बळ्ळारी नाल्यातील अतिक्रमण थांबवा
म. ए. समिती व शेती बचाव संघटनेच्यावतीने निवासी जिल्हाधिकार्‍यांना बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. अतिक्रमण होत असल्यामुळे नाल्यातील पाणी शिवारात शिरून पिकांची हानी होत आहे. अतिक्रमणे रोखावीत, अशी मागणी केली. यावर इटनाळ यांनी नाल्याची पाहणी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.