Sat, Mar 23, 2019 18:51होमपेज › Belgaon › नऊ मतदारसंघात राष्ट्रीय पक्षात तुल्यबळ लढत

नऊ मतदारसंघात राष्ट्रीय पक्षात तुल्यबळ लढत

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 8:30PMकानडी भाषिकांचे वर्चस्व असणार्‍या जिल्ह्यातील 9 मतदार संघात भाजप, काँगेस आणि निजदमध्ये लढत रंगणार आहे. कागवाड मतदार संघात मराठी भाषिकांचे मतदान निर्णायक ठरणार असून अन्य मतदार संघात कानडी भाषिकांचा भरणा आहे. काँग्रेसने मागील 5 वर्षांत राज्यातील एकहाती सत्ता सांभाळत असताना केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजपच्या ताब्यात असणारे मतदार संघ हिसकावून घेण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. तर भाजपने राज्यात कमळ फुलविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याचा चंग बांधला आहे. निजदचीही अस्तित्वाची धडपड सुरु आहे.

अरभावी 
अरभावी मतदारसंघात आजपर्यंत जारकीहोळी बंधुचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या गोटात असणारे भालचंद्र जारकीहोळी येथून तिसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस व निजदचे आव्हान आहे.

भालचंद्र जारकीहोळी हे मागील विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताने विजयी झाले होते. ते यावेळी पुन्हा एकदा रिंगणात असून त्यांना मतदारातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. काँग्रेसने अरविंद दळवाई यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांना पक्षाकडून किती प्रमाणात रसद पुरविण्यात आलेली आहे, त्यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. निजदने माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या मागे  निजदची परंपरागत मतदार उभे आहेत. 

बैलहोंगल 

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना याठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
भाजपने आ. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी आ. जगदीश मेटगूड यांनी बंडखोरी करून भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. परिणामी भाजप मतांमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

याठिकाणी काँग्रेसने माजी विधान परिषद सदस्य महांतेश कौजलगी यांना उमेदवारी दिली आहे. तर निजदने जि. पं. सदस्य शंकर मुडलगी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

सौंदत्ती 

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला  या मतदार संघात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपचा विजय याठिकाणी सुकर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आम. आनंद मामनी यांच्यासमोर काँग्रेसने विश्‍वास वैद्य यांना उमेदवारी दिली आहे.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा वरदहस्त त्यांच्यावर असल्यामुळे उमेदवारी मिळाली, मात्र उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍या आनंद चोप्रा यांनी बंडखोरीचे निशाण उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे. चोप्रा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. निदजतर्फे दोड्डगौड पाटील निवडणुकीत आहेत.

कागवाड 

बेळगाव आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपने आ. राजू कागे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असून काँग्रेसने श्रीमंत पाटील यांना दिली आहे. निजदच्यावतीने माजी आ. कल्लाप्पाण्णा मग्गेण्णावर निवडणूक लढवित आहेत.

राजू कागे यांनी मतदारसंघात आपले सातत्याने वर्चस्व ठेवले आहे. यापूर्वी निजदच्या माध्यमातून श्रीमंत पाटील यांनी हा मतदारसंघ सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलेे नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या गोटात सामील होवून कागेंना आव्हान दिले आहे. त्याचबरोबर कल्लाप्पा मग्गेण्णावर यांनी दोन्ही उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांनाही मतदारातून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कित्तूर 

पक्षीय राजकारणाबरोबर कौटुंबिक मतभेदाचे राजकारण याठिकाणी रंगले आहे. काँग्रेसचे उमेदवार डी. बी. इनामदार यांना त्यांच्याच घरातून आव्हान मिळाले असून बाबासाहेब पाटील या त्यांच्या भाच्याने बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना घाम फुटला आहे. 

भाजपची मदार माजी आ. सुरेश मारिहाळ यांच्या करिष्म्यावर  अवलंबून आहे. आ. डी. बी. इनामदार यांच्या कौटुंबिक राजकारणाचा फायदा भाजप उमेदवाराला होईल, असा अंदाज भाजपकडून वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर निजदनेही तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे मतांची फाटाफूट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. 

रायबाग 

भाजपच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजप उमेदवार आ. दुर्योधन ऐहोळे यांना जोरदार दणका देण्यासाठी प्रदीपकुमार माळगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु याठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून त्याचा लाभ पुन्हा एकदा भाजपला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत दुर्योधन ऐहोळे यांचा निसटता विजय झाला. तर अपक्ष उमेदवार प्रदीपकुमार माळगी यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी काँग्रेसने माळगी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा विजय सोपा होता. मात्र, महावीर मोहिते यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विजयात अडसर निर्माण झाला आहे.

गोकाक 

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या जोरदार आव्हानाचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची जबाबदारी असतानादेखील त्यांना प्रचारासाठी आपल्याच मतदारसंघात अडकून पडावे लागले  आहे.

भाजपने पूर्वाश्रमीचे निजदचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अशोक पुजारी यांना उमेदवारी दिली आहे. पुजारी यांच्या माध्यमातून भाजपने जोरदार आव्हान रमेश जारकीहोळी यांच्यासमोर उभे केले आहे. त्यामुळे जारकीहोळींना विजयासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत. निजदच्यावतीने करियप्पा पुजारी रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची सभा घेण्यात आली. त्या माध्यमातून मते मिळविण्याचा निजदचा प्रयत्न सुरू आहे.

कुडची 

अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार्‍या मतदारसंघात आ. पी. राजीव यांची कसोटी लागली आहे. त्यांच्यासमोर माजी आ. शाम घाटगे यांचे पुत्र अमित घाटगे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले आहे. त्याचबरोबर निजदचे राजेंद्र ऐहोळे उमेदवार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत आ. पी. राजीव यांनी बीएसआर काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजय खेचून आणला होता. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न पी. राजीव यांनी चालविला आहे. घाटगे यांनी आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावली आहे. त्यामुळे राजीव यांना काँग्रेसला थोपविण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागत आहे.

रामदुर्ग 

भाजप-काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. आजी आमदारांना रोखण्यासाठी माजी आमदारांनी कंबर कसली आहे.

काँग्रेसने आ. अशोक पट्टण यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपतर्फे महादेवप्पा यादवाड रिंगणात आहेत. आ. अशोक पट्टण यांना काँग्रेसचे पक्षप्रतोद पद देण्यात आले होते. त्यांचे मंत्रिमंडळात वजन होते. त्या जोरावर त्यांनी अधिक विकासनिधी मतदारसंघासाठी वापरला आहे. याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. तर भाजपने त्यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करीत प्रचारात राळ उडविली आहे. माजी आ. महादेवप्पा यादवाड यांनी हा मतदारसंघ खेचून आणण्याचा चंग बांधला आहे.