Mon, May 20, 2019 18:54होमपेज › Belgaon › पोलिस कौन्सिलिंग यादी लटकली

पोलिस कौन्सिलिंग यादी लटकली

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 8:44PMनिपाणी : प्रतिनिधी

पंधरवड्यापूर्वी उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आलोककुमार जे. यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सुमारे 110 फौजदारांच्या बदल्यांसाठी कौन्सिलिंग घेऊन यादी जाहीर केली होती. मात्र अद्यापही यावर ठोस निर्णय झालेला नाही. या यादीवर राज्य सरकारने हरकत घेतल्याने जाहीर झालेली बदल्यांची यादी सरकार दरबारी लटकली आहे.

कोणत्याही एकाच स्थानकात सलग तीन वर्षे तेही स्थानिक जिल्ह्यातील पोलिस अधिकारी सेवेत असल्यास त्याची बदली करणे कमप्राप्त आहे. राज्यात मेमध्ये निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आयजीपी आलोककुमार यांनी कौन्सिलिंग घेतले. काही  कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजूही झाले. मात्र फौजदारांच्या कौन्सिलिंग बदली यादीला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
या कौन्सिलिंग दरम्यान ज्या त्या अधिकार्‍यांनी आपल्या व वरिष्ठांच्या सूचनेनुसार बेळगाव, बागलकोट, गदग, विजापूर, धारवाड जिल्ह्यातील विविध स्थानक प्रमुख पदावर आपल्या नियुक्‍तीची जबाबदारी स्वीकारली.

दि. 30 जानेवारी झालेल्या या कौन्सिलिंग यादीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे बदली झालेल्या अधिकार्‍यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील अनेक स्थानकातील फौजदारपदाच्या अधिकार्‍यांना बढती मिळाल्याने या जागा रिक्‍त आहेत. निपाणी शहर, बसवेश्‍वर चौक पोलिस स्थानक प्रमुख पदे रिक्‍त आहेत. तर नव्या कौन्सिलिंगद्वारे खडकलाटचे फौजदार बसगौडा पाटील यांची विजापूर येथे तर बसवेश्‍वर चौकच्या रोहिणी पाटील यांची बेळगाव येथे बदली झाली आहे. वरील दोन्ही पदे रिक्‍त असल्याने कधी सीपीआय किशोर भरणी तर कधी ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील तर कधी खडकलाटचे फौजदार बसगौडा पाटील यांना या पदाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.