Fri, Jul 19, 2019 14:18होमपेज › Belgaon › ‘बुडा’च्या निषेधार्थ शेतकर्‍यांचा आत्महत्येचा इशारा

‘बुडा’च्या निषेधार्थ शेतकर्‍यांचा आत्महत्येचा इशारा

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा कडाडून विरोध असताना कणबर्गी येथील सर्व्हे क्र. 486 ते 526 एकूण क्षेत्र 160 एकर ही द्विपिकी जमीन बुडाने संपादन करण्याचा व विकासकामे राबविण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. बुडाच्या या कटकारस्थानाच्या विरोधात कणबर्गी येथील काही शेतकर्‍यांनी जमिनीसाठी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यासाठी कणबर्गी येथील शेतकर्‍यांनी दि. 9 मार्च रोजी बुडा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

मोर्चाला कणबर्गी बसस्थानक येथून सकाळी 9 वा. प्रारंभ होणार आहे. सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी बुडाने 2007 मध्ये शेतकर्‍यांना 6/1 नोटिसा बजावल्या होत्या. त्यावेळी तेथील शेतकर्‍यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध करून कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने स्थगितीचा आदेश बजावूनसुद्धा बुडाने जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बुडाच्या या कृत्यामुळे कणबर्गी येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. याविरुद्ध शेतकरी 9 मार्च रोजी बुडावर मोर्चा काढणार आहेत. मोर्चामध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन माजी महापौर शिवाजी सुंठकर व इतर शेतकरी नेत्यांनी केले आहे.