होमपेज › Belgaon › वनाधिकारी कार्यालयाला शेतकर्‍यांचा घेराव

वनाधिकारी कार्यालयाला शेतकर्‍यांचा घेराव

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 9:00PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील भारतीय कृषक समाजाच्यावतीने शेतकर्‍यांनी जिल्हा वनाधिकारी कार्यालयाला घेराव घालून आपल्या समस्या मांडल्या. सकाळी धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाने शेतकरी बांधव जिल्हा वनाधिकारी कार्यालयावर  गेले. अधिकार्‍यांनी येऊन त्यांच्या समस्या ऐकून ठोस आश्‍वासन देईपर्यंत ठिय्या आंदोलन छेडले. 

सोमवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौकात मोठ्या संख्येने खानापूर तालुक्यातील शेतकरी बांधव भारतीय कृषक समाजाच्या अधिपत्याखाली एकवटले. आपल्या समस्या निवेदनामार्फत मांडण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकापासून कॉलेजरोड, चन्नम्मा सर्कल, आरटीओ कार्यालयाला वळसा घालून जिल्हा वनाधिकारी कार्यालयाला शेतकर्‍यांनी घेराव घातला. 

वन्यप्राण्यांकडून शेतकर्‍यांवर होणारे हल्ले व पिकांचे होणारे नुकसान या समस्यांच्या निवारणार्थ ठोस कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांच्या मोर्चाचे आयोजन केेले होते. कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धनगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

अस्वलाच्या हल्ल्यात मरण पावलेले कौंदल येथील शेतकरी गणपती अण्णू पाटील यांच्या कुटुंबियांना 25 लाख रु. चे साहाय्य देण्यात यावे, त्यांच्या पत्नीला पाच हजार रु. दरमहा पेन्शन देण्यात यावी. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत स्थान देण्यात यावे. आजपर्यंत तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याची नुकसान भरपाई तातडीने जमा करावी. यापुढे जंगली जनावरांपासून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना आखाव्यात.  

कोणत्याही प्राण्यापासून शेतकर्‍याला इजा पोहचू नये. शेतकर्‍यांनी भयमुक्त वातावरणात शेती करावी. यासाठी वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा. जंगलातून शेताकडे जाणारे रस्ते वनविभागाने बंद करु नयेत. खराब झालेले रस्ते वनविभाग अथवा सरकारच्या अन्य योजनेतून दुरुस्त करण्यात यावेत.परशराम ना. कापोलकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, आदी मागण्या मांडण्यात आल्या. 

या आंदोलनात भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष सिद्दगौडा मोदगी, तालुका अध्यक्ष अर्जुन परशराम गावडा, दुंडय्या पुजारी, संजू सोनूलकर, परशराम पाटील, सोनलिंग कमतगी, रामलिंगगौडा, गंगाराम अगसगेकर, चांगदेव देसाई यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी भाग घेतला.