शेतकर्‍यांची विधिमंडळावर धडक

Last Updated: Oct 11 2019 1:12AM
Responsive image

Responsive image

बेळगाव : प्रतिनिधी

पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी उत्तर कर्नाटकमधील शेतकर्‍यांनी चंद्रशेखर  कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली बंगळूरमध्ये विधिमंडळावर धडक मोर्चा काढला. सायंकाळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्वत: शिष्टमंडळाशी चर्चा करून याच अधिवेशनात यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, शेतकर्‍यांना पुरेशी मदत देण्यात येईल, यासाठी संयम ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

उत्तर कर्नाटकमधील विविध जिल्ह्यांमध्ये महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अडीच लाखांहून अधिक घरे पडली आहेत. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी उघड्यावर पडला असताना याला  तीन महिने उलटूनही शासनाकडून मदत आलेली नाही. पीक हानीबद्दल घोषणा झालेली नाही. केवळ मंत्र्यांचे दौरे आणि घोषणाबाजी शिवाय काही मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ रेल्वेस्थानकापासून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. विधिमंडळाजवळ येताच पोलिसांकडून हा मोर्चा अडवण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. दुपारी साडेतीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आंदोलकांना भेटण्यासाठी आले. लवकरच पीकहानीची भरपाई देण्यात येईल. याच अधिवेशनात याचा निर्णय होईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आश्वासन अमान्य करून 

आंदोलन सुरुच ठेवले. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याशी भेटीला गेले. यावेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी याच अधिवेशनामध्ये पूरग्रस्तांसाठीची मदत आणि पीकहानीची नुकसान भरपाई जाहीर करुन ती तात्काळ देण्यात येईल, यासाठी थोडा संयम राखून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्यात येत आले. आंदोलनामध्ये मल्लिकार्जुन रामदुर्ग, मल्लिकार्जुन देसाई, रवी सिध्दमण्णावर, महांतेश पुजार,  आनंद हुलकट्टी, शिवाप्पा अब्बानी, लक्ष्मण स्वामी, शिवानंद दोडमणी आदी सहभागी झाले होते.