Sat, Jul 20, 2019 02:34होमपेज › Belgaon › भाजी कवडीमोल, ऊसबिलेही थकीत

भाजी कवडीमोल, ऊसबिलेही थकीत

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 07 2018 12:13AMबेळगाव : प्रतिनिधी

भाजीपाल्याचे दर अचानक कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऊस उत्पादकांचे बिलदेखील कारखानदाराकडेच शिल्लक असून शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. 
बेळगाव तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविण्यात येतो. यावर बहुतांश शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या होलसेल भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे दर कोसळले आहेत. कोबी एक रुपया किलो आणि  टोमॅटो दोन रुपयांवर आला आहे.भाजी उत्पादनासाठी शेतकर्‍यांना  लागणारी बियाणे, औषधे, पाणी, वीज, मजुरी, वाहतूक, बारदान याचे दर वाढलेले आहेत. त्या तुलनेत भाजीपाल्याला दर नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

शेतकर्‍यांचे अर्थकारण प्रामुख्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे. यामुळे दर कमी झाल्याचा फटका सहन करावा लागत आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील बहुतांश उसाचे गाळप झाले आहे. परंतु, कारखानदारांकडून शेतकर्‍यांना उसाचे बिल अदा करण्यात आलेले नाही. फडातून उसाची उचल केल्यानंतर पंधरा दिवसात शेतकर्‍यांचे बिल कारखान्याने अदा करावे, असा सरकारचा नियम आहे. 15 डिसेंबरपर्यंत उसाची उचल केलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना बिले अदा केली आहेत. उर्वरित ऊस उत्पादकांना देण्यात आलेले नाही.

विजेचा खेळखंडोबा

तालुक्यातील पश्चिम भागात थ्री फेज वीजपुरवठा अनियमित आहे. यामुळे शेतकर्‍यांना यातायात करावी लागते. कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. वारंवार वीजकपात करण्यात येते. यामुळे मोटर नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. 

कर्जमाफीचा उपयोग काय?

50 हजार रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र ती सरसकट लागू नाही. मृत्यू पावलेल्या शेतकर्‍यांचेच कर्ज माफ होणार आहे. ही सुविधा सरसकट करावी, अशीही मागणी आहे.