Wed, Mar 20, 2019 23:02होमपेज › Belgaon › हेस्कॉमकडून शेतकर्‍यांची फसवणूक

हेस्कॉमकडून शेतकर्‍यांची फसवणूक

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:46PMकाकती : वार्ताहर

काकती येथील सुपीक जमिनीतून हेस्कॉमकडून उच्च दाबाच्या तारांसाठी खांब उभारणी करण्यात येत आहे. यासाठी भूसंपादन करण्यात येत असून तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. हेस्कॉमने शेतकर्‍यांच्या मागणीनुसार नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

येथील शिवारातून उच्च दाबाच्या वीज तारा नेण्यात येत आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी टॉवर उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. 

उच्च दाबाच्या वीज तारा गेलेल्या जागेखाली कोणत्याही प्रकारची विकासकामे करता येत नाहीत. आधुनिक शेतीसाठी आवश्यक यंत्रणेचा वापर करता येत नाही. त्याचबरोबर टॉवरसाठी अधिक भूसंपादन करण्यात येत आहे.गौंडवाड, काकती, होनगा परिसरातील सुपीक जमिनीत हे प्रकार सुरू आहेत. केपीटीसीएलने अधिक नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडू असा इशारा रविवारी शेतकर्‍यांनी दिला. केपीटीसीएलने काही शेतकर्‍यांना 40 हजार रुपये इतकी तुटपुंजी नुकसान भरपाई दिली आहे. असाच प्रकार कंग्राळी येथील शेतकर्‍यांच्याबाबतीदेखील घडला आहे. शेतकर्‍यांनी हा प्रकार धुडकावून लावला असून कोणीही याप्रकारचा निधी स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, माजी एपीएमसी अध्यक्ष बाबुराव पिंगट, सिद्राय गवी, अरुण पाटील, नाना टुमरी, शिवानंद हालण्णावर, सचिन गवी, भरत येतोजी, महादेव देसाई आदीसह शेतकरी उपस्थित होते.