होमपेज › Belgaon › शेतकरी आक्रमक, प्रस्ताव स्थगित

शेतकरी आक्रमक, प्रस्ताव स्थगित

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 1:23AMबेळगाव  प्रतिनिधी

अलारवाड येथे सांडपाणी प्रकल्पासाठी जागा संपादन करण्यात आली आहे. रविवारी पुन्हा शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता नाल्याशेजारी मोठ्या आकाराचे पाईप ठेवून सुपीक जमिनीत ते घालण्यासाठी मार्किग चालू झाल्याने वडगाव शिवारातील  शेतकर्‍यांमध्ये खळबळ माजली. शेतकर्‍यानी आक्रमक भूमिका घेतल्याने पाईपलाईन घालण्याचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.एवढ्या मोठ्या पाईप सुपीक जमिनीत घातल्या तर आम्ही नांगर फिरवायचा कसा, असा प्रश्‍न शेतकर्‍यांनी उपस्थित केला. पाईप घालण्यासाठी करण्यात आलेले मार्किंग पुसून जमीन पूर्ववत केली.

शनिवारी माकिर्र्ंग करून रविवारी पाईप आणून ठेवल्याने वडगाव भागातील शेतकरी संभ्रमात पडले.हलगा भागातील शेतकर्‍यांच्या जागा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासंदर्भात दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अनगोळपासून सांडपाणी वाहून नेण्यासाठी महानगरपालिका पाईपलाईन घालत आहे. ते पाणी थेट बळ्ळारी नाल्यात सोडण्याचा विचार आहे. मात्र त्यासाठी वडगाव भागातील शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीचा उपयोग कशाकरिता, असा जाब विचारल्यानंतर या भागातील पाईप बाजूला हटवून ते बळ्ळारी नाल्याशेजारी जेसीबीच्या सहाय्यानेे ठेवण्यात आले आहेत.

महानगरपालिकेची वक्रदृष्टी असून यापूर्वी हलगा पुलाजवळ झालेल्या अतिक्रमणाकडे महानगरपालिकेने कानाडोळा केला आहे. यासंदर्भात पतंप्रधानांपासून कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस खाते, महापालिका, तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकर्‍यांनी न्याय मागितला आहे. अद्याप शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. त्यासाठी न्यायालयीन मार्गाने लढा चालू आहे.रस्त्यावरची लढाईही सुरू आहे. शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मनपा पावले उचलत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.