Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Belgaon › ठिबक सिंचनात ‘हंदिगनूर’ची छाप

ठिबक सिंचनात ‘हंदिगनूर’ची छाप

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:23PMबेळगाव : प्रतिनिधी

वाढती पाणीटंचाई व शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शेतर्‍यांनी आधुनिक शेतीपध्दतीची कास धरली आहे. हंदिगनूरमध्ये अनेक शेतकर्‍यांनी ठिबक सिंचन शेतीला महत्त्व देऊन याचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला आहे. यामुळे हे गाव ठिबक सिंचन शेती गाव म्हणून नावारूपाला येत आहे. 

अनेक शेतकर्‍यांनी शेतवडीतील विहिरी, कूपनलिकांच्या माध्यमातून शेती व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र या शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने आधुनिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे ठरले. हंदिगनूर येथील अनेक शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देण्यासाठी  ठिबक सिंचन वापर केला आहे. हा विषय चर्चेचा ठरला आहे. 
गावाला मोठ्या प्रमाणात सुपीक शेती असली तरी पूरक पाणीपुरवठा योजना नाही. योजना राबविण्यासाठी कोणतेच जलस्रोत नाहीत. यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून शेती करण्यावर अनेक शेतकर्‍यांनी भर दिला आहे. आधुनिक शेतीचे फायदे लक्षात आल्यानंतर बहुतांश शेतकरी याकडे वळले आहे.

पाण्याची  बचत, मिळणारे अधिक उत्पन्‍न, तण कमी करण्यासाठी शेतीमध्ये पिकांच्या सभोवताली घलण्यात येणारे प्लास्टिकचे आच्छादन अशा पध्दतीतून शेती लाभदायक ठरत आहे.

उन्हाळ्या बरोबरच  पावसाळ्याध्येही प्लास्टिक आच्छादनाच्या माध्यमातून पीक घेण्यावर भर देण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी भरपूर असले तरी पिकात वाढणारे तण कमी करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन उपयोगी ठरत असल्याचे शेतकरी सांगतात.