Thu, Jun 27, 2019 16:00होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांचा एल्गार

शेतकर्‍यांचा एल्गार

Published On: Jul 10 2018 1:22AM | Last Updated: Jul 10 2018 1:07AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरु सेना यांच्या वतीने चन्‍नम्मा चौकात सोमवारी एल्गार पुकारत तीन तास ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी नसल्याने निवासी जिल्हाधिकारी एस. बुद्धाप्पा यांनी येऊन निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्हाधिकार्‍यांनी येऊन निवेदन स्वीकारल्याशिवाय हटणार नाही, असा पावित्रा घेतला. मात्र, जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास चन्‍नम्मा चौकात मोर्चा वळविला. रिंगण करून चौकात बैठे आंदोलन छेडले. निवासी जिल्हाधिकारी एस. बुद्धाप्पा यांनी निवेदन स्वीकारून आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.चन्नप्पा पुजारी, लिंगराज पाटील, अशोक यमकनमर्डी, रवी सिद्धण्णवर, भरमू खेमलापुरे, मल्लिकार्जुन रामदुर्ग, कल्लनगौडा पाटील, जयश्री गुरेन्नवर, गोपाळ कुकनूर, महांतेश कमतीसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी होते.

रहदारी पोलिसांची गोचीकोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकर्‍यांनी अचानक चन्नम्मा चौकात रास्ता रोको आंदोलन छेडल्याने रहदारी पोलिसांना गणपती मंदिर, होनगा रोड व कोर्ट कंपाऊंड येथील रस्ता बंद करावा लागला.  काकतीवेस रोड, कोर्ट कंपाऊंड, आंबेडकर गार्डन व क्‍लब रोड येथून वाहतूक वळवावी लागली.शेतकर्‍यांचा रुद्रावतार पाहून पोलिस कुमक चन्नम्मा चौकात वाढविण्यात आली. शेतकरी आक्रमक होतील म्हणून सापळा आणला होता. किरकोळ वादावाद वगळता आंदोलन सुरळीत पार पडले. दुचाकीस्वारांची आंदोलकांबरोबर बाचाबाची झाली. 

अशा आहेत मागण्या...

शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे

बचतगटांना कर्ज माफी द्यावी

कळसा-भांडुरा योजना जारी करावी

उसाची थकीत बिले व्याजासह परत करावीत

महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रतिटन 3400 रु. दर द्यावा