Thu, Apr 18, 2019 16:00होमपेज › Belgaon › भात रोपांसाठी शेतकर्‍यांची वणवण

भात रोपांसाठी शेतकर्‍यांची वणवण

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 7:19PMबेळगाव : प्रतिनिधी

मागील महिनाभर सुरु असलेल्या पावसामुळे वडगाव, शहापूर शिवारात बळ्ळारी नाल्याचे पाणी घुसून अनेक शेतकर्‍यांची भात पिके खराब झाली आहेत. काही ठिकाणी अजूनही फुगवटा आहे. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाली आहे, तेथे भात रोप लागवड केली जात आहे. मात्र भात रोप मिळत नसल्याने रोपांसाठी शेतकर्‍यांची वणवण सुरू आहे. 

चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी वडगाव, शहापूर शिवारात पाण्याचा फुगवटा आहे. काही वर्षापूर्वी बळ्ळारी नाल्याची खोली जास्त होती. यामुळे पूर आल्यानंतर दोन किंवा तीन दिवसात पाणी ओसरत होते. मात्र प्रशासनाने नाला सफाई व खोदाईकडे  दुर्लक्ष केल्यामुळे नाल्याची खोली कमी झाली आहे. यामुळे जोरदार पाऊस पडताच पूर्ण शिवारात पाणी भरते. आठ ते पंधरा दिवस पाणी ओसरत नाही. यामुळे शेतकर्‍यांची पिके खराब होतात. सध्या हीच स्थिती बळ्ळारी नाला परिसरातील शेतकर्‍यांची झाली आहे. 

नाला परिसरातील अजून शेकडो एकर जमीन पाण्याखाली आहे. यामुळे अनेक शेतकरी पाणी कधी ओसरेल, याच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पाणी ओसरले आहे. त्या ठिकाणी शेतकर्‍यांनी रोप लागवड सुरु केली आहे. अशा शेतकर्‍यांना कामगारांची समस्यादेखील भेडसावत आहे. बहुतांश शेतकर्‍यांना भात रोपांची समस्या येत आहे. यामुळे त्यांना वणवण फिरावे लागत आहे. 

नाला परिसरातील शेतकर्‍यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले आहे. यामुळे त्यांना नाहक अडचणी येत आहेत. अनेक शेतकर्‍यांची शेती फक्त याच शिवारात असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाल्यातील पाणी शेतीत सुमारे दहा दिवसांपासून असल्याने बहुतांश पिके खराब झाली आहेत. दुबार पेरणीमुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत.नाल्याला पूर आल्यानंतर  अनगोळ, वडगाव, शहापूर, खासबाग, यळ्ळूर आदी भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाते. पाऊस कमी होऊन चार दिवस झाले तरीदेखील काही ठिकाणी पाणी अजूनही आहे. यामुळे शेतकर्‍यांना समस्या निर्माण झाली आहे.

समस्या मिटणार कधी?

अनेक वर्षापासून नाल्यातील पाणी शेतवडीत जाऊन शेकडो एकर शेती पाण्याखाली जाते. यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येतात. पावसाने उसंत घेतल्याने पूर कमी होत आहे. यामुळे शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शहर परिसरात किमान दोन तास जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा या भागात पुरसदृश स्थिती निर्माण होईल. सध्या रोप लागवड सुरु असली तरी पुन्हा पाऊस पडल्याने त्यालादेखील धोका आहे. समस्या मिटणार कधी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांतून उपस्थित केला जात आहे. 

नाल्यातून पाणी जात नाही. कचरा, गाळ आहे. त्यामुळे पाणी शेतीत येते. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. काही शेतकर्‍यांची शेती कुजली आहे.  पुलांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. नाल्याची खोदाई होणे गरजेचे होते. शेतवडीतील पाणी नाल्यातून जाणे गरजेचे आहे. दुबार पेरणी संकट कायम आहे. वडगाव, शहापूर, अनगोळ, जुने बेळगाव हा शेतीतील भाग जास्त खराब होतोय.  - सुभाष लाड, शहापूर