Wed, Nov 14, 2018 12:27होमपेज › Belgaon › कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍याची आत्महत्या 

कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍याची आत्महत्या 

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 09 2018 12:21AMबेळगाव : प्रतिनिधी 
कर्ज व ऊसपुरवठा केलेल्या कारखान्यांकडून उसाचे बिल न मिळाल्याामुळे निराश झालेल्या शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. चिन्‍नाप्पा गंगाप्पा अमरापूर (वय 61, रा. विरप्पनकोप्प, ता. बेळगाव) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
चिन्‍नाप्पा यांनी हिरेबागेवाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 8 लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच काही सहकारी बँकांमधून 2 लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतात त्यांनी ऊस पिकवला होता. तो ऊस गोकाक कारखान्याला अडीच वर्षांपूर्वी पाठवला होता. मात्र, कारखान्याकडून उसाचे 1.30 लाख रुपये तसेच एम. के. हुबळी कारखान्याला पाठवलेल्या उसाचे  50 हजार रुपये येणेबाकी आहे. 
उसाच्या बिलातून कर्जाची रक्कम टप्याटप्याने भरण्याचे चिन्नाप्पाचे नियोजन होते.  मात्र, कारखान्यांकडून उसाचे बिल मिळाले नाही. वारंवार विचारणा करूनही बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. अखेर चिन्नाप्पाने शुक्रवारी पहाटे 5 वा. राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
चिन्नाप्पाने कीटकनाशक पिल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने सकाळी 7.30 वा. त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात दाखल झाली आहे.