Tue, Apr 23, 2019 14:08होमपेज › Belgaon › कर्नाटकात येणार्‍या बनावट नोटा जप्‍त

कर्नाटकात येणार्‍या बनावट नोटा जप्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

महसूल दक्षता संचालनालयाने विशाखापट्टण येथे शनिवारी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या 510 बनावट नोटा जप्त केल्या. 12 मे रोजी होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात वापरण्यासाठी या नोटा आणण्यात येत होत्या, अशी माहिती त्या दोघांकडून मिळाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच चिकोडीमध्येही 40 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

विश्‍वसनीय माहितीच्या आधारे दक्षता अधिकार्‍यांनी इस्ट-कोस्ट एक्स्प्रेसने हावडा ते हैदराबाद प्रवास करणार्‍या दोघांची विशाखापट्टणमजवळ शनिवारी झडती असता त्यांच्या बॅगच्या उशीमध्ये पाच बंडलमधून लपविलेल्या दोन हजार रुपयांच्या 510 नोटा आढळल्या. 

यप्रिकरणी अटक केलेले दोन्ही आरोपी बंगळूरमधील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित असून पश्‍चिम बंगालमधील माल्डाजवळ फराक्‍का या ठिकाणी त्यांच्याकडे या बनावट नोटा देण्यात आल्या होत्या. 
विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटकात पैशांचा पूर येण्याची शक्यता आहे. मतदारांना वाटण्यासाठी अनेक नेत्यांनी आपली बँकांमधील खाती रिक्‍त केली आहेत. त्यामुळे बँकांकडचे चलन कमी झाले आहे. त्याचा परिणाम एटीएमवरही जाणवत असून, अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. 

बँकांकडचे चलन कमी झाल्यामुळे काही समाजविघातक शक्तींनी बनावट नोटा निवडणुकीच्या माध्यमातून बाजारात खपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच माल्डामधून हैदराबादमार्गे बनावट नोटा कर्नाटकात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अटकेतील दोघांनी दिली.

माल्डा हे बनावट नोटांचे केंद्रच मानले जाते. प. बंगाल आणि बांग्ला देशाच्या सीमेवरील या शहरात बांग्लामधून सहजपणे प्रवेश करता येतो. त्यामुळेच पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेने बांग्लामार्गे बनावट भारतीय नोटा भारतात पुरवल्या आहेत, अशी माहिती एनआयचे निरीक्षक सचिन काटे यांनी दिली होती. हैदराबाद-गुलबर्गा-विजापूर-चिकोडी हा मार्गही कर्नाटकात पैसे आणण्यासाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे  हैदराबादमार्गे येणारे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात येत होते, ही माहितीही मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेही दक्षता पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. ढालुमिया इस्लाम नामक युवक चिकोडी प्रकरणाचा सूत्रधार आहे. विशाखापट्टणममध्ये सापडलेल्या रकमेचा सूत्रधार कोण, याचाही तपास सुरू आहे.

महाराष्ट्र, गोवा, केरळ, तेलंगण, आंध्र आणि तमिळनाडूच्या सीमांवरही नाकाबंदी केली आहे. परराज्यातून अवैध मार्गाने पैसे अथवा वस्तू निवडणूक काळात कर्नाटकात येण्यापासून रोखण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. सामान्य माणसाला 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम, उमेदवाराला 20 हजारांपर्यंतची रक्कम ने-आण करण्यास बंधन नाही. कोगनोळी नाक्यावर तीन कारवाईंमध्ये  सुमारे 30 लाखांची रक्कम जप्त केली आहे.

Tags : Fake currency, seized, Karnataka,


  •