Tue, May 21, 2019 18:58होमपेज › Belgaon › सात कोटींच्या बनावट नोटा जप्त ; एकाला अटक

सात कोटींच्या बनावट नोटा जप्त ; एकाला अटक

Published On: Apr 18 2018 1:03PM | Last Updated: Apr 18 2018 2:19PMबेळगाव: प्रतिनिधी

जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांच्या निवासस्थानी शेजारी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टसमधून मंगळवारी मध्यरात्री सुमारे 7 कोटी रुपयाच्या 500 व 2000 रुपयाच्या बनावट नोटा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी अजितकुमार निडोणी (रा. विजापूर) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सदाशिवनगरनगर येथे जिल्हाधिकारी व इतर सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्याच्याशेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याची क्वाटर्स असून याठिकाणाहून रात्री एक वाजण्याचा सुमारास कारवाई करून बनावट नोटा जप्त केल्या. अजितकुमार नडोणी यांनी याठिकाणी बनावट नोटांचा साठा करून ठेवला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या नोटामध्ये 25 हजार 300 नोटा 500 रुपयाच्या तर 29,300 नोटा 2 हजार रुपयांचा समावेश आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त एस. बी. पाटील, एपीएमसीचे निरीक्षक रमेश शहापूर, सीसीआयबीचे निरीक्षक चंद्रकांत तसेच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली. याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी चिकोडी येथे आढळून आलेल्या बनावट नोटानंतर बेळगाव येथे बनावट नोटा आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या या बनावट नोटा निवडणूक काळात वापरण्यासाठी साठा करून ठेवण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 

Tags : Fake, Currency, Notes, Seized, Arrest, Police, Belgaon, Karnataka, Election