Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Belgaon › एसबीआयला पावणेतीन कोटींना फसविण्याचा प्रयत्न 

एसबीआयला पावणेतीन कोटींना फसविण्याचा प्रयत्न 

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMबेळगाव : प्रतिनिधी 

उत्तर प्रदेश सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या खात्याचे बनावट चेक देऊन 2 कोटी 72 लाख रुपये दुसर्‍या खात्यावर वर्ग करण्याचा  प्रयत्न करणार्‍या चौघांना एपीएमसी पोलिसांनी बुधवारी अटक केली.

उत्तर प्रदेश सरकारचा बनावट चेक देऊन फसवणुकीचा प्रयत्न मंगळवारी झाला होता. त्याबद्दल बँकेचे कर्मचारी पराग निमसे यांनी तक्रार दिली होती. आरिफ शिवापूर (रा. शाहूनगर), शशिधर नागनूर (रा.रुक्मिणीनगर), नारायण शेट्टी (रा.म्हैसूर), महम्मद गौस फजल रेहमान (रा. म्हैसूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर महम्मद  अब्दुल सत्तार आणि इम्रान (दोघेही रा. म्हैसूर) हे दोन संशयित फरारी आहेत. 

आरिफ शिवापूर याने मंगळवारी हनुमाननगरमधील स्टेट बँकेत जाऊन उत्तर प्रदेश सरकारच्या रोजगार हमी खात्यावरची 2 कोटी 72 लाख 138 रुपये रक्‍कम आपल्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सरकारचा बनावट चेक दिला. तसेच सही बनावट केली होती. त्याशिवाय ही रक्‍कम त्याच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ती शशिधर नागनूर आणि नारायण शेट्टी यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी आपल्या खात्याचे धनादेश दिले होते. 

मात्र, संशय आल्याने बँकेने पडताळणी केली असता, उत्तरप्रदेश सरकारचा चेक बनावट असल्याचे सिध्द झाले. त्यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. चौघांही संशयितांना आज सायंकाळी मिलन हॉटेलजवळ अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक जे.एम.कालीमिरची यांनी पुढील तपास चालविला असून पोलिस आयुक्‍त डी.सी.राजप्पा तपासावर लक्ष देऊन आहेत.