Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Belgaon › बालक-माता मृत्यू प्रमाण रोखण्यात अपयश

बालक-माता मृत्यू प्रमाण रोखण्यात अपयश

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

अर्भक आणि मातेच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. गरोदरपणात आई व मुलाचे आरोग्य चांगले राहावे. सकस आहार मिळावा, यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. तरी देखील बेळगाव जिल्ह्यामध्ये अर्भक-माता मृत्यूचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आरोग्य खात्याला अपयश आल्याचे समोर आले आहे. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रोज सरासरी चार बाळांचा मृत्यू होत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. 2017-18 मध्ये 1389 बाळांचा मृत्यू झाला आहे. तर 40 मातांचाही मृत्यू झाला असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. सदर आकडेवारीतून आरोग्य खात्याला आलेले अपयश निदर्शनास येत आहे. सदर माता व बाळांचा मृत्यू जिल्हा इस्पितळात झाला आहे. ही चिंतनीय बाब आहे. 

सदर मृत्यू पावलेल्या बाळांमध्ये जन्म झाल्यानंतर 816 बाळांचा तर गरोदरपणात 573 बाळांचा मृत्यू झाला आहे. केवळ बेळगाव जिल्ह्यामध्येच इतक्या प्रमाणात बाळांचा मृत्यू झाला असल्याने आरोग्य खात्याच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

बालक व मातांचे मृत्यू प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना प्रसुती सुरक्षा, मडीलु कीट, ताई भाग्य, जननी शिशु सुरक्षा योजना यासह गरोदरपणात माता व बाळाचे आरोग्य सुरक्षित रहावे. दोघांनाही सकस आहार मिळावा. यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सकस आहार पुरवठा केला जातो. तसेच मातृपूर्ण योजनाही जारी करण्यात आली आहे, असे असले तरी या योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी होत नसल्याने बालक व मातांच्या मृत्यू प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

जिल्हा इस्पितळासह 9 तालुका इस्पितळे 16 शहर समुदाय आरोग्यकेंद्रे आहेत. मात्र, या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यांची कमतरता असल्याने इतक्या प्रमाणात माता व बाळांच्या मृत्यू झाल्याचे कारण असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी माता व बाळांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आलेले अपयश आरोग्य खात्याला विचार करण्यास भाग पाडत आहे. 

एप्रिलमध्ये 5 माता, 86 बालकांचा मृत्यू

आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 एप्रिल या एकाच महिन्यात 7500 प्रसुती झालेल्या महिलांमध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 86 बालकांचा जन्मल्यानंतर मृत्यू झाला आहे. तर 42 बालकांचा जन्मापूर्वीच मृत्यू झाला आहे. सकस आहाराची कमतरता, वैद्याधिकार्‍यांचा निष्काळजीपणा, कुटुंबियांकडून झालेले दुर्लक्ष अशी कारणे माता आणि बाळाच्या मृत्यूस कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.