Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांविरुद्ध  एफआयआर दाखल?

सिद्धरामय्यांविरुद्ध  एफआयआर दाखल?

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:42PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मुडाचे चेअरमन सी. बसवेगौडा, डी. ध्रुवकुमार व मुडाचे आयुक्‍त पी. एस. कांतराजू यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा आदेश म्हैसूर जिल्हा द्वितीय अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाने बजावला आहे.  त्यांच्यावर बेकायदेशीर जमीन हडप केल्याचा आरोप आहे.

सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री असताना त्यांनी बेकायदेशीररीत्या जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 21 वर्षांपूर्वी जमीन हडप केल्याचा संशय आहे.  अ‍ॅड. एन. गंगाराजू यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने सदर आदेश बजावलेला आहे. 

सिद्धरामय्या यांच्यासाठी बेकायदेशीररीत्या जमीन दिल्याचा आरोप ध्रुवकुमार व कांतराजू यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हिनकल गावातील सर्व्हे नं. 70/4ए ही शेतकी जमीन 1997 मध्ये जिल्हाधिकार्‍यांनी एनए करून दिली. त्यावेळी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने (मुडा) ना हरकत प्रमाणपत्र इमारत बांधण्याकरिता देऊन टाकले. सदर इमारत परवाना घेताना टाऊन व कंट्री प्लॅन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यानंतर ती जमीन सिध्दरामय्या यांनी खरेदी केली आहे.

मुडाने त्या जागेवर 1998 मध्ये इमारत बांधण्याकरिता प्लॅन मंजूर करून दिला. त्यानंतर सिध्दरामय्या यांनी ती मालमत्ता 2003 मध्ये 1 कोटी रुपयांना विक्री केली. त्या जागेला लागूनच मुडाची जमीनही आहे. त्या जागेवर म्हैसूर महानगरपालिका इमारत बांधणार होती. परंतु सिध्दरामय्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली होती. सिध्दरामय्या व मुडाचे चेअरमन सरकारी मालमत्ता लाटण्यामध्ये सहभागी झाले असून ती मालमत्ता 30 गुंठ्याची आहे. म्हैसूर न्यायालयाने लक्ष्मीपुरम् पोलिस स्थानकाला त्या तिघांविरुध्द एफआयआर दाखल करण्याचा आदेश बजावलेला आहे.