Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बुदिहाळमधील अभियंत्याच्या सुटकेसाठी परराष्ट्रमंत्र्यांकडे धाव

बुदिहाळमधील अभियंत्याच्या सुटकेसाठी परराष्ट्रमंत्र्यांकडे धाव

Published On: Jul 10 2018 1:22AM | Last Updated: Jul 10 2018 1:02AMनिपाणी : प्रतिनिधी

बुदिहाळ येथील मर्चन्ट नेव्हीमधील अभियंता सतीश विश्‍वनाथ पाटील याच्या सुटकेसाठी त्याच्या कुटुंबियांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यंच्याकडे धाव घेतली असल्याचे मामा रावसाहेब  शिरगावे यांनी सांगितले.शिरगावे यांनी परराष्ट्रमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची प्रत सादर केली. जहाजावर आक्षेपार्ह साहित्य सापडले म्हणून सतीशसह जहाजाचे मालक व इतर पाच जणांना ग्रीसच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये सतीशचा समावेश आहे. अ‍ॅड्रोमेडा ग्रीज शिप या कंपनीच्या जहाजावर सहा महिन्यापासून तो काम करीत होता.

12 जानेवारी 2018 रोजी या कंपनीचे जहाज तुर्कीवरुन ग्रीसला जात असता ग्रीसच्या कस्टम अधिकार्‍यांनी ते पकडले. सतीशसह जयदीप ठाकूर, गगनदीप कुमार, भूपेंद्रसिंग, रोहताश कुमार या पाच जणांना चौकशीसाठी ग्रीस पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीवेळीच आक्षेपार्ह साहित्य जप्‍त करुन संबंधित मालकाला अटक  झाली. सतीशच्या सुटकेसाठी परराष्ट्रमंत्र्यांकडे दाद मागितली असल्याचे  सतीशचे वडील विश्‍वनाथ पाटील यांनी सांगितले.सतीशबरोबर ताब्यात असलेले इतर चार जण बंगळूर, पंजाब परिसरातील रहिवासी आहेत. येत्या 12 रोजी या सर्व प्रकरणावर ग्रीस येथील न्यायालयात सुनावणी होणार असून यावेळी अडकलेल्या सर्वांच्या सुटकेचा महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याचे शिरगावे यांनी सांगितले.

अनेकांकडून मदतीचे सहकार्य

सतीश ग्रीसमध्ये पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी सोमवार दि. 9 रोजी ‘पुढारी’मध्ये प्रसिध्द झाली. यामुळे सोमवारी दिवसभर सतीशच्या कुटुंबियांशी अनेकांनी संपर्क साधून माहिती जाणून घेत मदतीचे सहकार्य केले.