होमपेज › Belgaon › महत्त्वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचवा : सिध्दरामय्या 

महत्त्वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहोचवा : सिध्दरामय्या 

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 10:48PMजमखंडी : वार्ताहर

सरकारच्या अन्नभाग्य, क्षीरभाग्य, मातृपूर्ण, कृषी भाग्य अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य अधिकार्‍यांनी करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, बदामीचे आमदार सिध्दरामय्या यांनी केले.

बदामी तालुका पंचायत सभागृहात जिल्हास्तरीय अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बदामी मतदार संघात शुध्द पण्याचे पाणी व अन्य मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात त्याचबरोबर रेशनवर धान्य, विद्यार्थ्यांना भोजन, दूध, अंडी, गरोदर स्त्रियांना पौष्टिक आहार कार्यात पारदर्शकता असावी, अशी सूचना केली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात पीयुसी उत्तीर्ण सर्व समुदायाच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे कार्य लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार सिध्दरामय्या यांनी सांगितले. बदामीत 2099 पासून सरकारी महाविद्यालयत सुरू असून स्वतःची इमारत नसल्याने त्वरित बांधकामाचे काम हाती घेण्याची सूचना संबंधित खात्याला केली. तसेच गुळेदगुड्ड येथे सरकारी महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीप्रमाणे लवकरच मंजुरी देण्याचे आश्‍वासन दिले. आजची बैठक अधिकार्‍यांचा परिचय करून घेण्याकरिता असून पुढील बैठकीत खात्याची माहिती घेऊन अधिकार्‍यांनी हजर राहावे अन्यथा माहिती न देणार्‍या अधिकार्‍याविरुध्द त्वरित कारवाई करण्याचा इशारा दिला.

बागलकोट जिल्ह्यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 2 समुदाय आरोग्य केंद्रे असून सर्व तालुका आरोग्य केंद्रातून डायलेसिस व आयसीयू सोय आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. एन. देसाई यांनी दिली.बदामी तालुक्यात यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली असून शेतकरी मशागतीत गुंतला आहे व तालुक्यात केरूर, गुळेदगुड्ड, बेलूर, कुळगेरी या चार केंद्रातून सवलतीच्या दरात बियाणांचे व खतांचे वितरण करण्यात येत असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले.

घरकुल, स्मशान, हागणदारीमुक्‍त याविषयी सूचना दिल्या. बदामी मतदारसंघात 126 शुध्द पाणी पुरवठा केंद्रे असून 4 केंद्रे बंद पडली असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी के. जी. शांताराम, जिल्हा पंचायत अधिकारी विकास सुरलकर आदी उपस्थित होते.