Tue, Jul 23, 2019 07:30होमपेज › Belgaon › ‘बेळगाव’ विभाजनासाठी नेमणार तज्ज्ञांची समिती!

‘बेळगाव’ विभाजनासाठी नेमणार तज्ज्ञांची समिती!

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:35AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्याचे त्रिभाजन करून चिकोडी आणि गोकाक जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी सोमवारी बंगळूर येथे बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा तज्ज्ञ समिती नेमण्याचा जुनाच कित्ता गिरवला. त्यामुळे चिक्‍कोडी या वेगळ्या जिल्ह्याची मागणी करणारे खा. प्रकाश हुक्केरी संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले.

सोमवारच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. बैठकीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी बंगळूरला सर्वपक्षीय आमदार, खासदार, विधान परिषद सदस्यांना आमंत्रित केले होते. काँग्रेसकडून खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, पालकमंत्री रमेश जारकिहोळी, आ. सतीश जारकिहोळी, आ. डी. बी. इनामदार व कुडचीचे आमदार पी. राजीव उपस्थित होते. जिल्ह्यातील भाजपचे व काँग्रेसचे आमदार, विधान परिषद सदस्यांसह लोकप्रतिनिधी अनुपस्थित असल्याचे समजते.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चिक्‍कोडी जिल्ह्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. याचवेळी खा. प्रकाश हुक्केरींनी जिल्ह्याची मागणी योग्य असून समिती न नेमता त्वरित जिल्ह्याची  निर्मिती करावी, अशी मागणी केली.  पण नकार मिळाल्यानंतर संताप व्यक्‍त करून ते बैठकीतून सभेतून बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्रीही बैठक गुंडाळून निघून गेल्याचे समजते.