Wed, Jan 23, 2019 20:05होमपेज › Belgaon › झाडांवरून चालत अनुभवा निसर्ग सफर!

झाडांवरून चालत अनुभवा निसर्ग सफर!

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 9:38PMखानापूर : वासुदेव चौगुले

मनाला भुरळ पाडणारे निसर्गाचे आल्हददायक रूप पाहण्यासाठी पश्‍चिम घाटाइतके दुसरे निसर्गसंपन्न ठिकाण जवळपास सापडणार नाही. या अनोख्या निसर्गसफरीची मजा तीही जमिनीपासून 30 फूट उंचावरून घनदाट झाडांवरून अनुभवणे, हे तर दुर्मीळच. या अर्ध्या तासाच्या सफरीत बिबट्यापासून दुर्मीळ कीटक व पशुपक्ष्यांचे सौंदर्य न्याहाळणे, ही थ्रीलरपर्वणी निसर्गप्रेमींना आता खुल्या जंगलात अनुभवता येणार आहे.

कॅसलरॉकपासून अवघ्या 15 कि. मी. वरील कुवेशी येथे देशातील पहिला झाडांवरून जाणारा कॅनोपी पदपथ तयार करण्यात आला आहे. येत्या 18 रोजी या अनोख्या 240 मीटर लांबीच्या पदपथाचे वनमंत्री रामनाथ राय, उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे आणि पर्यटनमंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्य पर्यटन विभाग आणि वनखात्याच्या संयुक्त प्रयत्नातून हा अभिनव प्रकल्प राबविण्यात आला आहे.

काळी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंवर्धन अधिकारी ओ. पलाई म्हणाले, जंगलाला भेट देण्यासाठी येणार्‍या जनतेत पर्यावरणप्रेम वाढीस लावण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयोग असून काम अंतिम टप्यात आले आहे. पर्यटन विभागाने अनेक महिन्यांच्या परिश्रमातून हा पदपथ साकारला आहे. याकामी वनखात्याने पर्यटन विभागाला मोलाचे सहकार्य केले आहे. 

उद्घाटनानंतर या पुलाची जबाबदारी कोणाकडे द्यावी, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. परिसरातील जंगल लॉज अथवा पर्यटन विभागाकडून या वॉकपाथचे नियोजन ठेवले जाण्याची शक्यता आहे. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 

तीन वर्षापूर्वी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती.  वन्यप्राण्यांना यामुळे त्रास सहन करावा लागण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त करून हरकत घेण्यात आली होती. कायदेशीर अडचणी दूर झाल्याने अखेरीस प्रकल्पाची पूर्तता झाली आहे. दांडेली संरक्षित अभयारण्याचा भाग असलेल्या कॅसलरॉक वन्यजीव विभागाचे व्यवस्थापन सध्या काळी व्याघ्र प्रकल्पाकडून  केले जात आहे. भविष्यात कॅसलरॉक विभागातील 248 चौरस कि.मी. चे जंगल क्षेत्रफळ काळी संरक्षित व्याघ्र प्रकल्पाला जोडले जाण्याची शक्यता आहे. यामुळे येथील सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.