Fri, Mar 22, 2019 22:50होमपेज › Belgaon › कर्नाटकी अत्याचार विसरणार का?

कर्नाटकी अत्याचार विसरणार का?

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:46PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातून मराठी संस्कृतीचे संपूर्णपणे उच्चाटन करण्याचा विडा कानडी प्रशासनाने व नेत्यांनी उचलला आहे. मराठी जनतेला लक्ष्य करून मारबडव करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, कागदपत्रांचे कानडीकरण करणे अत्याचार अव्याहतपणे सुरू आहेत. त्यामुळे आपले मत क्षणिक आमिषाच्या पायदळी देऊ नका, अस्मितेसाठी मतदान करा, बंडखोरांना जागा दाखवून द्या, अशी हाक  सीमावासीयांनी दिली आहे. प्रचारकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनीही तेच आवाहन केले होते.

सीमाभागात आज मराठी मतदारांची सत्त्वपरीक्षा आहे. मतदानाच्या माध्यमातून मराठी जनतेच्या स्वाभिमानावर घाव घालण्याची तयारी कानडी प्रशासनाकडून सुरू आहे. आमिषे दाखवून मराठी मते फोडण्याचे कुटील कारस्थान रंगत आहे. यासाठी सावध होण्याची गरज आहे.

सीमालढा मागील 62 वर्षांपासून धगधगत आहे. मराठी माणूस हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी लढा देत आहे. सर्व प्रकारचा त्याग करीत आहे. तर मस्तवाल प्रशासन सीमाभागातील मराठी संस्कृती नष्ट करण्याच्या दुष्ट हेतून पछाडले आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि लिपी हद्दपार व्हावी यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. 

बेळगाव ही मराठी भाषिकांची मातृभूमी. मराठी भाषिक येथील भूमिपुत्र. या भूमिपुत्रांना या भागातून हद्दपार करण्याची तयारी जोमाने सुरू आहे. सरकारी कार्यालयातील फलक कानडी भाषेत लिहिले आहेत. मराठी भाषेतील फलक हटविले आहेत. सरकारी दप्तराचे पूर्णपणे कानडीकरण केले आहे. सरकारी परिपत्रके, सातबारा उतारे, वीजबिले केवळ कानडी भाषेतून पुरविण्यात येतात. मराठी जनतेला कानडी भाषेतील उल्लेख समजत नाही.  मराठी युवकांना सरकारी नोकरीमध्ये संधी देण्यात येत नाही. मराठी शाळा बंद पाडविण्याचे उद्योग जोमात आहेत. बसवरील फलक केवळ कानडीत लावण्यात येत आहेत. पोलिसस्थानकात केवळ कानडीचा अटाहास धरण्यात येतो. मराठीतून बोलल्यास बदडून काढण्यात येते. 

काळादिन, हुतात्मादिन, महामेळावा अशा अस्मितेच्या कार्यक्रमासांठी परवानगी मिळवतानाही महत्प्रयास करावे लागतात. अशा लढ्यांमध्ये सहभागी होणार्‍या मराठी युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्यात येते. या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी, सीमावासीयांचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठी उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मध्यवर्ती समितीसह ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार, सीमालढ्यातील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते आ. प्रकाश आबीटकर आदींनी केले आहे. काही बंडखोरांनी सीमावासीयांच्या मनात दुहीची बिजे पेरण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना कदापि यश मिळणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असेही आवाहन करण्यात आले आहे.