Thu, May 23, 2019 05:07होमपेज › Belgaon › शहर स्वच्छतेसाठी रोज ७ लाख

शहर स्वच्छतेसाठी रोज ७ लाख

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 12:06AMबेळगाव : प्रतिनिधी

‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा नारा देत बेळगाव मनपाने शहराच्या स्वच्छतेसाठी पुढच्या वर्षभराकरिता 28 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच रोज साडेसात लाख रुपये स्वच्छतेवर खर्च होणार आहेत. त्यामुळे तरी बेळगाव स्वच्छ दिसावे, अशी अपेक्षा बेळगाववासीयांकडून व्यक्‍त होत आहे. त्याचबरोबर उत्पन्‍नवाढीसाठी खुल्या जागा विकण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यावर बैठकीत गदारोळ माजला.

मनपा सभागृहात बुधवारी सादर करण्यात आलेल्या 2018-19 सालच्या अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शहराला आदर्श शहर बनविण्यासाठी सर्वाधिक 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापौर संज्योत बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत अर्थ आणि कर स्थायी समितीचे अध्यक्ष संजय सवाशेरी यांनी केवळ 16 लाख 17 हजारांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. येत्या वर्षभरात महापालिकेला एकूण  318 कोटी 52 लाख 26 हजारांचे उत्पन्‍न अपेक्षित आहे.

पारितोषिकासाठी लाखाचा निधी 

एकूण खर्च 318 कोटी 36 लाख 9 हजार गृहित धरण्यात आला आहे.  साधकबाधक चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.शहरातील स्वच्छतेसाठी एकूण 28 कोटी तरतुदीपैकी 4 कोटी घनकचरा प्रक्रियेसाठी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर स्वच्छतेबाबत शालेय विद्यार्थ्यामध्ये जागृती मोहीम राबविण्याची तरतूद केली आहे. प्लास्टिकला पर्याय ठरणार्‍या पर्यावरणस्नेही वस्तू बनविणार्‍यासाठी पारितोषिक देण्यासाठी लाखाचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रभाग विकास

14 व्या वित्त आयोगातून प्रत्येक प्रभागाला 12 लाख रुपये देण्यात येणार आहेत. यातून पाण्याची योजना, शौचालये, पदपथ, गटार, उद्यान आदीसाठी खर्च केला जाणार आहे. 

मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी 4 कोटी खर्चून व्यापारी गाळे बांधण्यात येतील. त्याचबरोबर काही रिकाम्या जागा विकून त्यातून उत्पन्न वाढविण्यात येणार आहेत. विजेच्या शुल्कात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 55 लाख रुपयाची तरतूद केली आहे.

मालमत्ता कर मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात येणार आहे. डिसेंबर 2017 मध्ये मालमत्ता करातून 24 कोटी 81 लाख इतका विक्रमी महसूल जमा केला आहे. त्याचपद्धतीने यावर्षीची कर जमा करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून यातून 37 कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट आहे .

व्यवसाय परवान्यातून मनपाला  1 कोटी 10 लाख, हिडकल धरणातून उद्योजकांना पुरविण्यात येणार्‍या पाण्यातून 3 कोटी 50 लाख , 1 कोटी 10 लाख जाहिरात फलकातून महसूल मिळण्याची तरतूद केली आहे. शहरातील पथदीप देखभालीसाठी 3 कोटी 75 लाख, रस्ते दुरुस्तीसाठी 5 कोटी, पदपथांसाठी 75 लाख, पावसाळ्यात गटार दुरुस्तीसाठी 1 कोटी निधीची तरतूद आहे.