Mon, Apr 22, 2019 15:45होमपेज › Belgaon › छप्पर कोसळले तरी शिक्षण निरंतर

छप्पर कोसळले तरी शिक्षण निरंतर

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:04PMविजापूर : प्रतिनिधी

शाळेचे छप्पर कोसळले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच आहे. ही कथा आहे विजापूर तालुक्यातील होनवाड खेड्यातील शाळेची. होनवाड मध्ये या मॉडेल प्राथमिक शाळेत 116 विद्यार्थी पहिली ते सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. वादळी वार्‍यामुळे शाळेचे छप्पर कोसळले. तरीही ग्रा.पं.अथवा लोकप्रतिनिधींनी छप्पर दुरूस्तीकडे मुळीच लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. या शाळेची पडझड झाल्याची माहिती पंचायत व सरकारी अधिकार्‍यांना माहिती आहे. तरीही त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांनी मात्र पडलेल्या शाळेत वर्ग भरवून विद्यादानाचे कार्य निरंतर सुरूच ठेवले आहे. पहिली दुसरी आणि तीसरी असे वर्ग एकत्र घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे.  स्थानिक लोकप्रतिनिधीमात्र जबाबदारी झटकत आहेत. पंचायतीच्या प्रत्येक बैठकीत या शाळेच्या दुरूस्तीचा मुद्दा मांडण्यात येतो. परंतु अधिकारी दुर्लक्ष करतात असे सांगून लोकप्रतिनिधी हात वर करत आहेत.  या शाळेमध्ये वर्गखोल्या अपुर्‍या आहेत. छप्पर कोसळल्यामुळे तीन चार वर्ग एकत्रित करून शिकविण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे एका शिक्षकाने सांगितले. या शाळेमध्ये केवळ तीनच शिक्षक आहेत. 116 विद्यार्थ्यांना शिकवणे त्यांना जड जाते. अतिरिक्त शिक्षक नेमण्याची मागणीही यापूर्वी अनेकदा करण्यात आली परंतु शिक्षण विभागाने दुर्लक्षित केल्याचा आरोप त्यांनी केला. 

विजापूर तालुक्यातील शाळेची कथा

शाळा दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी आमच्याकडे केली आहे. हे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. परंतु आम्हाला निधीची कमतरता आहे. गट शिक्षण अधिकार्‍यांबरोबर चार वेळा बैठक घेऊनही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती सार्वजनिक शिक्षण खात्याचे संचालक के. रायाप्पा रेड्डी यांनी दिली.