Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Belgaon › भाजप,काँग्रेस पक्षाला समान संधी

भाजप,काँग्रेस पक्षाला समान संधी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 8:44PMबंगळूर : प्रतिनिधी

गदग जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत. 2013 मध्ये सर्व मतदारसंघांत भाजपने विजय मिळवून इतिहास घडविला होता. या निवडणुकीत  त्याची पुनरावृत्ती करण्याची धडपड भाजप करत आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात वर्चस्व असणार्‍या काँग्रेसकडून सर्व जागा वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याकरिता हे दोन्ही पक्ष राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा प्रभाव पाडण्याचा आटापिटा करत आहेत. 

दुष्काळी भाग म्हणून जिल्ह्याकडे पाहिले जाते. मलप्रभा आणि तुंगभद्रा नद्या येथून वाहतात. मात्र, या पाण्याचा शेतकर्‍यांना योग्य वापर करणयासाठी ठोस योजना कोणत्याच सरकारने आतापर्यंत हाती घेतल्या नाहीत. कोणताही मोठा उद्योग येथे नाही. लिंगायत मतदारांची संख्या अधिक असून जातनिहाय हिशेब घातला जात आहे. सर्वच मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्या लढत आहे. काही राजकारण्यांची गुंडगिरी, त्यांच्याकडून स्थानिक नेते, मतदारांवर येणार्‍या दबावाची चर्चा आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बंडखोरी नाही.

नरगुंद मतदारसंघात काँग्रेसचे आमदार बी. आर. यावगल आणि भाजपचे माजी मंत्री सी. सी. पाटील यांच्यात लढत आहे. याआधीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचे पुरावे देऊन यावगल पुन्हा एकदा संधी देण्याची याचना मतदारांकडे करत आहेत. तर त्यांचे बंधू आणि इतर नातेइवाईक कौटुंबिक कलहामुळे सी. सी. पाटील यांच्या पाठीशी आहेत.निजदतर्फे माजी आमदार एस. एफ. पाटील यांचे पुत्र गिरी मल्‍लनगौडा रिंगणात असून भाजपची मते त्यांना मिळू शकतात. येथे लिंगायत मते निर्णायक आहेत. 

शिरहट्टी राखीव मतदारसंघात विद्यमान आमदार रामकृष्ण दोडमनी काँग्रेसतर्फे तसेच माजी आमदार रामण्णा लमाणी भाजपतर्फे रिंगणात आहेत. आमदार दोडमनी यांच्या धोरणाविरूद्ध मतदार नाराज आहेत. सिंगटालूर योजनाग्रस्तांचे सांत्वन त्यांनी केले नाही. भूमाफियांकडून त्यांचे नाव घेतले जात असल्याने प्रतिमा मलीन झाली आहे. गत निवडणुकीत लमाणी केवळ 315 मतांनी पराभूत झाले होते. या निवडणुकीत त्यांना मतदारांची सहानुभूती मिळणे शक्यत आहे.

गेल्या चाळीस वर्षांत काँग्रेसने केलेल्या कामांचा हिशेब भाजप उमेदवार मेणसीनकाई मतदारांसमोर मांडत आहेत. राज्य, राष्ट्रीय नेत्यांद्वारे होणार्‍या प्रचाराचा प्रभाव मतदारांवर पाडताना ते दिसत आहेत. 

रोण मतदारसंघात काँग्रेसतर्फे आमदार बी. एस. पाटील, भाजपतर्फे कळकप्पा बंडी यांच्यात थेट लढत आहे. निजद आमदार रवींद्रनाथ यांचे आव्हान या दोन्ही उमेदवारांसमोर आहे. हालुमत समाजातील मते निर्णाय असून या समाजातील काही नेते भाजपसोबत असल्याने काँग्रेसला विजयाची चिंता आहे. लिंगायत मतदारसंख्या वाढली आहे. निजदला मिळणार्‍या मतांवर उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.