Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Belgaon › संतप्त शेतकर्‍यांचा एल्गार!

संतप्त शेतकर्‍यांचा एल्गार!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:58PMखानापूर : प्रतिनिधी

वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले आणि पिकांचे होणारे नुकसान यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीच नकोशी झाली आहे. वन्यप्राण्यांकडून उध्वस्त होणार्‍या पिकांबरोबरच शेतकर्‍यांचा जीवही कवडीमोल झाला असून वन्यप्राण्यांच्या हल्यातील बळींच्या कुटुंबियांना किमान 25 लाख रु. चे सहाय्यधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह वनविभागाच्या निषेधार्थ तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी एल्गार पुकारून सोमवारी अचानक बेळगाव-गोवा महामार्ग रोखून धरला. त्यामुळे अधिकार्‍यांसह पोलिसांचीही भंबेरी उडाली.शेतकरी नेते सिद्धनगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली जांबोटी क्रॉसवरील बसवेश्‍वर चौकात 12 वा. रास्तारोको करुन चारही बाजुची वाहतूक रोखून धरण्यात आली. 

रास्तारोकोची पोलिसांनाही कल्पना नव्हती. परिणामी अर्धा तासातच दिड की. मीपर्यंत वाहनांची दुतर्फा रांग लागली. गर्दी वाढू लागल्याने जांबोटी क्रॉसवर हजारोंचा जमाव एकत्रित आला. आंदोलक शेतकर्‍यांनी वनविभागाचे अधिकारी येऊन लेखी आश्‍वासन देत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरुन हलणार नसल्याचे सांगितले.रास्ता रोकोबाबत आधी कळविले असते तर संबंधित वनाधिकार्‍यांना बोलाऊन तोडगा काढता आला असता. ऐनवेळी सर्व अधिकारी कसे उपलब्ध होतील, असे सांगून पोलिसांनी शेतकर्‍यांना रास्तारोको मागे घेण्याची विनंती केली. मात्र वनखात्याच्या आश्‍वासनांनी आम्ही थकलो असून त्यांच्यावर आमचा भरोसा राहिला नाही. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, अशी भूमिका शेतकर्‍यांनी मांडली.

अखेरीस तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांनी घटनास्थळी येऊन शेतकरी नेत्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी  नागेश भोसले म्हणाले, रानडुक्कर, गवा, मोर, अस्वल, चितळ यासारख्या प्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जंगलप्रदेशाला लागून असलेल्या शिवारांमध्ये तर शेतकर्‍यांनी शेती करणेच बंद केले आहे. त्यात भर म्हणून अस्वलाचे शेतकर्‍यांवरील हल्ले वाढले आहेत. वर्षाकाठी दोन ते तीन शेतकर्‍यांचा वन्यप्राण्यांच्या हल्यात बळी जात आहे. हे रोखण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा.

पंधरा दिवसापूर्वी कौंदल येथील शेतकरी अस्वलाच्या हल्यात मृत्यूमुखी पडला. सदर शेतकरी कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्याकरिता या कुटुंबाला मासिक 5 हजार रु. पेन्शन सुरु करावी. कुटुंबातील सदस्याला वनविभागात कायमस्वरुपी नोकरी द्यावी. तसेच यापुढे वन्यप्राणी हल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना किमान 25 लाख रु. ची भरीव नुकसान भरपाई द्यावी. या मागण्यांचा आग्रह धरण्यात आला.

आज बैठक

मंगळवारी सकाळी 11 वा. तहसीलदार कार्यालयात वनविभागाच्या अधिकार्‍यांसोबत शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन शक्य तेवढ्या समस्या निकालात काढण्यात येतील, अशी ग्वाही तहसीलदार उळागड्डी यांनी दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. कपोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, उपनिरीक्षक परशराम पुजेरी, वनविभागाचे विनायक पाटील यांच्यासह शेतकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

बळिराजाकडून माणुसकीचे दर्शन !

रास्तारोको आंदोलन सुरु असताना एका रुग्णवाहिकेतून बेळगावच्या दिशेने रुग्न नेण्यात येत होता. जांबोटी चौकात वाहने अडून राहिल्याने चक्का जाम झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आंदोलनासाठी रस्त्यावर बसलेले शेतकरी बाजूला झाले. त्यांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट मोकळी करुन दिली.  रुग्णवाहिका गेल्यानंतर पुन्हा शेतकर्‍यांनी आांदोलन सुरु ठेवले.  शेतकर्‍यांच्या या कृतीचे अधिकार्‍यांनीही कौतुक केले.