होमपेज › Belgaon › गायरानात अतिक्रमण, घरे उभारण्याचा प्रयत्न

गायरानात अतिक्रमण, घरे उभारण्याचा प्रयत्न

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 7:59PMबेळगाव : प्रतिनिधी

अलतगा येथील गायरानात लमाणी समाजाच्या काही कुटुंबांनी अतिक्रमण करून घरे बांधण्याचा बेकायदेशीर प्रकार चालवला आहे. यामुळे गावच्या मालकीची जागा हडप होणार आहे. अतिक्रमण करणार्‍यांना या ठिकाणी घरे उभारण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.उपरोक्त मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी अधिकार्‍यांनी संबंधित जागेची चौकशी करून काम थांबविण्याचे प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

गावातील सर्वे क्र. 55 मधील 47  एकर जागा राखीव आहे. ती गुरांच्या चार्‍यासाठी ग्रामस्थांकडून वापरण्यात येते. सांगली संस्थानकाळात सदर जागा ग्रामस्थांना देण्यात आलेली आहे. ग्रामस्थांनी  ही जागा एस. टी. कोडचवाड यांना लीजने दिली होती. त्यांनी या ठिकाणी खडी मशीन सुरू केेली. त्यांची मुदत संपल्यानंतर सदर जागा सोडून दिली. परंतु, खडी मशीनवर कार्यरत असणारी 7 लमाणी जमातीची कुटुंबे या ठिकाणी ठाण मांडून बसली आहेत.

लमाणी कुटुंबानी या ठिकाणी पक्‍की घरे बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामस्थांना जागा सोडण्याची अनेकवेळा विनंती करण्यात आली. परंतु, त्या कुटुंबानी त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.अलतगा येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये जनावरे आहेत. त्यांना चार्‍याची समस्या निर्माण झाली आहे. गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण कायम राहिल्यास त्याचा फटका ग्रामस्थांना बसणार आहे. यामुळे गायरानामध्ये घरे उभारणीस परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यापूर्वीही शिक्षण खात्याने सदर जागा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. याचबरोबर प्रशासकीय अधिकार्‍यांनी गायरान जागा विकत घेता येत नसल्याचा खुलासा केला होता. यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये, याची खबरदारी घेण्याची विनंती केली.यावेळी आर. आय. पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्ष गणपत सुतार, सदस्य चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडुम, संजय पाटील, पिराजी पावशे, बाबू पावशे, पुंडलिक पाटील, बाळू पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.