Fri, Jul 19, 2019 01:26होमपेज › Belgaon › उमेदवारांकडून वैयक्‍तिक संपर्कावर भर

उमेदवारांकडून वैयक्‍तिक संपर्कावर भर

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 8:13PMनिपाणी : प्रतिनिधी

येत्या 31 ऑगस्ट रोजी होणार्‍या निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शहरात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी  वैयक्तिक संपर्कावर भर देत वॉर्ड पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या  प्रचारामुळे शहरात इलेक्शन फिव्हर निर्माण झाला आहे. 

रिंगणातील अनेक उमेदवारांनी स्वत:च्या फोटोसह सोशल मीडियावरून प्रचार चालविला आहे. या निवडणुकीत माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ.  प्रा. सुभाष जोशी व नगराध्यक्ष  विलास गाडीवड्डर यांच्या आघाडीशी भाजपला टक्कर द्यावी लागणार आहे. गत निवडणुकीत जोशी-जोल्ले गटाने 6  जागा भाजप पक्ष चिन्हावर लढवून जिंकल्या होत्या.  सन 2008 साली  माजी आ. प्रा. सुभाष जोशी यांच्या निजदने तब्बल 23 जागा जिंकून करिष्मा दाखविला होता. या निवडणुकीत काय होणार, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करण्यासाठी सूत्रबध्द नियोजनही सुरु आहे. 

नाव सौं चे ओळख श्रीं ची शहरात वॉर्ड क्रं. 1, 6, 7, 8, 9, 11, 12,13, 15, 21, 25, 26 ,28, 29 व 30 या वॉर्डात महिला आरक्षण आले आहे. त्यामुळे 15 महिला नगरसेविका या वॉडार्ंतून निवडून जाणार आहेत. त्यासाठी अनेक महिला उमेदवार रिंगणात  आहेत. हे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असले तरी अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आपल्या हक्काच्या प्रभागात घरातीलच सौं ना रिंगण उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे नाव सौं चे आणि ओळख मात्र श्रीं ची अशी अनेक वॉर्डात परिस्थिती आहे. 

उमेदवारांनी प्रसिध्द केलेल्या सोशल मीडियावरील  सौभाग्यवतींच्या छबीसोबत पतीराजांचीही छबी झळकत आहे. पत्नीला नगरसेवक म्हणून निवडून देण्यासाठी पतींची दमछाक होत आहे. महिला आरक्षणामुळे उमेदवारीचा पत्ता आपोआप कट झालेल्या आजी-माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आपल्या सौं ची वरणी लावली आहे. महिला उमेदवारांना मात्र आपण यांच्या पत्नी, अशी ओळख दाखविण्यापलिकडे स्वत:ची वेगळी ओळख सांगणे कठीण झाले आहे. अनेक मावळत्या सभागृहातील नगरसेविकाही निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनाही त्यांच्या पतीराजांच्या कर्तृत्त्वाचा वारसा मिळत आहे. सर्वत्र चुरशीच्या आणि ईर्षेच्या लढती  होणार, असे दिसत आहेत.

6 वॉर्डातून एकच तर वॉर्ड 20 मधून एकही अर्ज नाही 

निपाणी पालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच दिवसात वॉर्ड क्र. 3, 5, 18, 23, 25 व 29 या 6 वॉर्डातून प्रत्येकी एकच अर्ज आला आहे. तर वॉर्ड क्र. 20 (परिशिष्ठ जाती) मधून अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे निवडणूक आयुक्‍तांनी पालिका निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. शनिवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख केली असून 20 रोजी अर्जांची छाननी, 23 पर्यंत माघार व 31 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचे नवे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शनिवारी मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.