Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Belgaon › एकी होईपर्यंत म.ए.समिती नेत्यांना डांबून ठेवा

एकी होईपर्यंत म.ए.समिती नेत्यांना डांबून ठेवा

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:35PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांमध्ये एकी होण्यासाठी त्यांना आज मेळावा होत असलेल्या कलमेश्वर मैदानाच्या शेजारील मंदिरात डांबून ठेवा, असे भावनिक आवाहन महाराष्ट्रातील नेत्यांनी मंगळवारी केले. 

जुने बेळगावमध्ये कलमेश्वर मंदिराच्या मैदानावर समितीचा जागृती मेळावा झाला. त्यात मार्गदर्शन करताना कोल्हापूर जि. पं. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात म. ए. समिती शाखा सुरु करु. ती राजकारणासाठी नव्हे तर सीमाप्रश्‍नी जागृतीसाठी. महाराष्ट्रातही सीमाप्रश्‍नी जागृतीची मोठी गरज आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी नेत्यांनी एकी करण्याची गरज आहे. त्यासाठी या नेत्यांना शेजारच्या कलमेश्वर मंदिरात डांबून ठेवा. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

सीमाप्रश्‍नी विशेष कक्षाचे माजी अधिकारी दिनेश ओऊळकर म्हणाले, सीमाप्रश्‍न राजकीय पुंडशाहीमुळे निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी अ‍ॅड. राम आपटे यांसह वकील मंडळी न्यायालयात लढत आहेत. 

मेळावा सुरु होण्यापूर्वी मराठी भाषिक कार्यकर्ते एकीचे फलक घेऊन मैदानामध्ये दाखल झाले. तसेच जुने बेळगाव फाट्यापासून मेळावा स्थळापर्यंत मान्यवरांना मिरवणुकीने नेण्यात आले. मिरवणुकीसाठी घोडेही आणण्यात आले होते.