होमपेज › Belgaon › वीज कर्मचार्‍यांना २६ टक्के वेतनवाढ 

वीज कर्मचार्‍यांना २६ टक्के वेतनवाढ 

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:38PMबेळगाव : प्रतिनिधी       

केपीटीसीएल व वीजपुरवठा मंडळातील  कर्मचार्‍यांना 26 टक्के वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे. वीजपुरवठा मंडळ कर्मचारी संघटना व अधिकारी संघटना प्रतिनिधींनी उर्जामंत्री डी.के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत शनिवारी सुधारित वेतनश्रेणीच्या करारावर स्वाक्षरी केली.

वीजपुरवठा मंडळाच्या कर्मचार्‍यांनी 38 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र वीज मंडळ संस्थांना आर्थिक बोजा होईल, असे सूचविण्यात आले. त्यानंतर 26 टक्के वेतनवाढीच्या निर्णयाला संमती दर्शविली. प्रत्येक 7 वर्षांनी होणार्‍या वेतनश्रेणी सुधारणे पध्दतीमध्ये यापुढे प्रत्येक 5 वर्षांनी सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती इंधनमंत्री डी.के.शिवकुमार यानी दिली.वीज मंडळ कर्मचार्‍यांच्या सुधारित वेतनश्रेणीनुसार किमान वेतन 12,991 रु.वरून 16,370 पर्यंत व कमाल वेतन 96,700 रु.वरून 1 लाख, 22, 240 रु.वाढ झाली आहे.

पेन्शनमध्ये 8,185 पासून 61 हजार रु. वाढ करण्यात आली आहे. वेतनवाढीमुळे 604 कोटी रु. व पेन्शन वाढीचा 240 कोटी रु.चा अतिरीक्त बोजा खात्यावर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. वीज मंडळात अभियंता नेमणुकीत इतर राज्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर ऊर्जामंत्री शिवकुमार यानी वृत्त निखालस खोटे असल्याचे म्हणाले. अभियंत्यांच्या रिक्त जागांवर नेमणूका पारदर्शकपणे करण्यात येत आहेत. स्पर्धात्मक परीक्षेद्वारे नेमणूका करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

नोकरीत कायम करणार

ग्रामीण विद्युत सहाय्यक पदावर सुमारे 3,500 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याचा आपला विचार आहे. खात्याचे अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात येत आहे. अहवाल हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही इंधनमंत्री शिवकुमार यानी सांगितले.