होमपेज › Belgaon › केवळ ८८ लाईनमन; भरती रखडली

केवळ ८८ लाईनमन; भरती रखडली

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:33PM

बुकमार्क करा

खानापूर: विलास कवठणकर

तालुक्यात वीजसेवेचे तीनतेरा  वाजले असून बारमाही वीज सेवा खंडित होणे, खांब मोडून पडणे, टिसी खराब होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुरुस्तीचा कार्यकाळ लांबल्यानेच या समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.  त्यात आता भर पडली आहे ती अपुर्‍या मनुष्य बळाची. गेल्या तीन वर्षात लाईनमनची भरती करण्यात आली नाही.तालुक्यातील पाच सेक्शनला 88 लाईनमन कार्यरत असून अद्याप 50 हून अधिक जणांची गरज आहे.

तालुक्यातील वीज सेवा विस्कळीत झाली असून वीजखांब, टीसी, वीजवाहिन्या शेवटची घटका मोजत आहेत. तालुका हेस्कॉम अधिकार्‍यांकडून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून येत्या दोन महिन्यात वीजखांब, वीजवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तालुक्यात खानापूर एसओ-1, एसओ-2, हलशी, बिडी आणि इटगी अशा पाच ठिकाणी हेस्कॉम सेक्शन कार्यालयांमध्ये 138 लाईनमनऐवजी 88 जण कार्यरत आहेत. तसेच हलशी, बिडीला कायमस्वरुपी सेक्शन अधिकार्‍यांची गरज आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी तात्काळ सेक्शन अधिकारी कार्यरत असून अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत आहे. खानापूर एसओ-2 मध्ये 158 दुर्गम भागातील खेड्यांची जबाबदारी असल्याने वीजसेवा दुरुस्तीला विलंब लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित चार सेक्शनमध्ये गावांची संख्या व मनुष्यबळही कमी आहे. यामुळे खानापूर एसओ सेक्शन-2 मधील काही गावे उर्वरित चार सेक्शनमध्ये वाटून दिल्यास जलद सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.    

दुर्गम भागात वीजसेवेचा बट्याबोळ 

जांबोटी, लोंढा भागासह तालुक्यातील दुर्गम भागातील वीजसेवेचा बट्याबोळ झाला आहे. वीजवाहिनी, वीजखांब, टीसी जळाला असल्याने महिना महिनाभर वीज सेवा खंडित होत असते. त्यामुळे पहिल्यांदा अशा परिसरातील वीजसेवा दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे.