Sat, Jul 20, 2019 15:23होमपेज › Belgaon › स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्येच!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्येच!

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:37AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील 116 स्थानिक स्वराज्य संस्थांतील 2,822 प्रभागांमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार असल्याचे  निवडणूक आयुक्‍त पी. एन. श्रीनिवासाचारी यांनी कळविले आहे. 

बंगळूर ग्रामीण, चिक्‍कबळ्ळापूर, चिक्‍कमगळूर, कोलार, रामनगर जिल्हे वगळून उर्वरित सर्व जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 सप्टेंबरला निवडणूक प्रक्रिया सुरू करून ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी लागणार आहे. त्याकरिता आयोगाकडून तयारी केली जात आहे.

24 जिल्ह्यांतील आरक्षण यादी मुद्रणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली आहे. निवडणुकीची तयारी करण्याची सूचना संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. त्यानुसार 2 ऑगस्टला कुमार गंधर्व रंगमंदिरात मतदान केंद्र पातळीवरील अधिकार्‍यांची (बीएलओ) बैठक बोलाविली आहे. सर्व संस्थांमधील प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. आरक्षण जाहीर करून हरकती मागविल्या आहेत. हरकतींवर विचार करून अंतिम आरक्षण जारी केले जाईल. प्रभागांची योग्य माहिती देण्यासाठी नकाशेही तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर प्रभागानुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम केले जाणार आहे.

न्यायालयीन लढा

प्रभाग आरक्षणाविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरून न्यायालयाने सरकारला कोंडीत पकडले आहे. सप्टेंबरमध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपणार आहे. असे असताना अजूनही अंतिम आरक्षण यादी जाहीर केली नसल्याने हा गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण जाहीर करण्याची ताकीद न्यायालयाने सरकारला दिली आहे.