होमपेज › Belgaon › चारही ‘स्थायी’वर मराठी सत्ता आणण्याचा निर्धार 

चारही ‘स्थायी’वर मराठी सत्ता आणण्याचा निर्धार 

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

मनपाच्या चारही स्थायी समितींची निवडणूक 25 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्या चारही स्थायी समित्यावर मराठी गटाची सत्ता आणण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या मराठी गट नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी गटनेते संजय शिंदे होते. मागील वर्षी आरोग्य स्थायी समिती वगळता तीन स्थायी समित्यांची सत्ता मराठी गटातील दुही व मतभेदामुळे विरोधी गटाच्या ताब्यात गेली होती. त्याबद्दल मनपा सभागृहात बहुमत असलेल्या मराठी गटाची नाचक्की झाली होती. मराठी गटाचे नेते म्हणून संजय शिंदे यांची निवड मराठी गटाच्या नगरसेवकांनी केल्यानंतर नगरसेवक-नगरसेविकांच्या एकिवर त्यांनी गंभीरतेने पावले उचलली व सर्वच्या सर्व 32 नगरसेवक -नगरसेविकांमध्ये चारही स्थायी समिती अध्यक्षपदावर सत्ता मिळविण्याचा निर्धार केला आहे. 

शुक्रवारी झालेल्या गटाच्या बैठकीला मराठी गटाचे 21 नगरसेवक उपस्थित होत्या.  उर्वरित नगरसेवकांच्या गटाच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याची संमती दिलेली असून काही कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे कळविले असल्याचे गटनेते शिंदे यांनी सांगितले. 

बैठकीत चारही स्थायी समितीवर निवड करण्याकरिता काही नगरसेवकांची नावे निश्‍चित केली असून यामध्ये नगरसेवक पुंडलिक परिट मिनाक्षी चिगरे, विजय पाटील, माया कडोलकर, रेणु मुतगेकर, विनायक गुंजटकर, मोहन बेळगुंदकर, दिनेश राऊळ, रूपा नेसरकर, सुधा भातकांडे, मोहन भांदुर्गे, वैशाली हुलजी, रतन मासेकर, मनोहर हलगेकर, मीना वाझ व राकेश पलंगे याचा समावेश आहे. 

मराठी गटातील नऊ सदस्यांना आतापर्यंत कोणतेही अध्यक्षपद मिळालेले नाही. अनंत देशपांडे व ज्योती चोपडे यांनी आपल्याला कोणतेच अध्यक्षपद नको असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदे आता सात सदस्यांतून निवडण्यात येणार आहेत. 

अध्यक्षपद कुणाला?

अध्यक्षपद कोणाला द्यावयाचे हे ठरविण्याचा अधिकार निवड कमिटीमधील किरण सायनाक, नागेश मंडोळकर, विनायक गुंजटकर, मीना वाझ, उपमहापौर मधुश्री पुजारी, गटनेते संजय शिंदे यांना देण्यात आलेला आहे. मराठी गटातील सर्वच नगरसेवक-नगरसेविका स्थायी समित्यांच्या निवडणुकीवरून एकत्र आल्याने त्यांच्यामधील उत्साह वाढीस लागलेला आहे. शुक्रवारी घेण्यात आलेली मराठी गटाची ही बैठक तिसरी आहे.