Fri, Mar 22, 2019 01:47
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › निवडणूक बेळगावात; मद्यसाठा चंदगडात

निवडणूक बेळगावात; मद्यसाठा चंदगडात

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कर्नाटक राज्याच्या सीमा महाराष्ट्रातील गडहिंग्लज व चंदगड तालुक्याला लागून आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र उत्पादन शुल्क खात्याने गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात छापा टाकून लाखो रु. गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या चोरट्या दारूच्या आयातीमागे कर्नाटकातील काळे धंदेवाल्यांचा हात असावा, असा  संशय कर्नाटक पोलिसांना आहे.

कर्नाटक राज्यात निवडणूक काळात अबकारी खात्याने दारू दुकानांना दारू पुरवठ्याबाबत मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना खुष करण्याची पंचाईत झाली आहे. नेतेही कार्यकर्त्यांना, आपल्या हितचिंतकांना खुश करण्यासाठी स्वस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या दारूला मोठी पसंती आहे.

काही दिवसांपूर्वी आमरोळी (ता. चंदगड) येथील राज्यमार्गावर विदेशी मद्याचे 46 बॉक्स पकडले. तर याच भागात उसाच्या मळ्यात लाखो रुपयांची गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र उत्पादन शुल्क खात्याने धाड टाकून जप्त केली.  अशाप्रकारे दररोज लाखो रुपयांची दारू महाराष्ट्रासह कर्नाटकात येत असल्याचा संशय आहे. 

बेळगावचे अबकारी आयुक्त के. अरुणकुमार यांनी जिह्यातील वाईन शॉप, दारू दुकानदारांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या पूर्वी 9 दारु दुकानांचा परवाना तात्पुरता रद्द केला आहे. 

चेकपोस्टलाच चेकमेट

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर बांदा व आंबोली  हे दोन चेकपोस्ट आहेत.  येथे 24 तास पोलिसांचा फौजफाटा असतो. तरीही महाराष्ट्रातून सीमाभागात गोवा बनावटीची दारू येतेच कशी काय? हा प्रश्‍न कायम आहे. यामागे तरुण कार्यरत आहेत. चोरट्या मार्गाने, आडवाटेने जंगलातूनही दुचाकीच्या सहाय्याने गोवा बनावटीची दारू येत असल्याचा संशय पोलिस प्रशासनाला आहे. 

क्राईम बॉर्डर मिटींग घेण्याचे आदेश

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बेळगावला लागून असणार्‍या परराज्यातीलही पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. झियाउल्ला यांनी पुन्हा एकदा क्राईम बॉर्डर मिटींग  घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

पंधरवड्यात जिल्ह्यात परवाना रद्द झालेली मद्यविक्री दुकाने

1)रेणुका चेकबार  (मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती) 
2)एन. आर. हेडण्णावर (मुगळखोड, ता. रायबाग) 
3)बनशंकरी असोसिएट सीएल 9 (रायबाग) 
4)निंगाप्पा मल्लाप्पा नरी वाईन टॅव्हरन (सौंदत्ती)
5)विश्‍वनाथ सिद्धाप्पा दाणे वाई टॅव्हरन (मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती) 
6)एमएसआयएल सीएल 11 सी (तिगडी, ता. बैलहोंगल)
7) बी. आर. बनशंकरी सीएल 2 (करोशी, ता. चिकोडी) 
8) एमएसआयएल सीएल 11 सी (रायबाग)
 9) एस. एन. सावळेकर दुर्गा वाईन शॉप  (मुडलगी, ता.गोकाक)