Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Belgaon › निवडणूक कामासाठी मयत कर्मचाऱ्याला नोटीस

निवडणूक कामासाठी मयत कर्मचाऱ्याला नोटीस

Published On: Apr 25 2018 10:07AM | Last Updated: Apr 25 2018 9:42AMकारवार : प्रतिनिधी

निवडणूक कामावर हजर राहण्यासंबंधी प्रत्येक सरकारी कर्मचार्‍याला निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात येत आहे. कारवार येथील सरकारी कार्यालयात  गीता नामक महिला कर्मचार्‍याच्या नावाने जिल्हा निवडणूक आयोगाकडून नोटीस  जारी करण्यात आली आहे. मात्र गीता यांचे  सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. मयत महिला कर्मचार्‍याच्या नावाने नोटीस कशी आली याचा शोध सुरू आहे.

 गीता  नोकरी  करीत असलेल्या कार्यालयाने कर्मचार्‍यांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठविताना गीता यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचा अनावधानाने यादीत उल्लेख केला असावा, त्यामुळेच मयत गीता याना नोटीस पाठविण्याची गंभीर चूक निवडणूक आयोगाकडून  झाली असावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

निवडणुक सक्तीचा आदेश रुग्णांना ठरतोय जाचक

 निवडणूक कामासाठी कर्मचार्‍यांची कमतरता भासत असल्याने या कामातून कोणालाही सवलत देऊ नका, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकार्‍यांना अर्थात जिल्हाधिकार्‍यांना बजावला आहे. 

निवडणुकीच्या कामासाठी सरकारी स्तरावरील सर्व खात्यामधील कर्मचार्‍यांना नेमण्यात येत आहे. तरीही कर्मचार्‍यांची कमरता भासणार आहेच. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी, सरकारी कार्यालयातील डी श्रेणी कर्मचार्‍यांना नेमण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने चालविला आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची अनुमती घेण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी संजीवकुमार यानी म्हटले आहे.

निवडणुकीच्या कामातून कोणालाही सवलत नाही म्हणजेच सर्व कर्मचार्‍यांना सक्तिचे असल्याने गंभीर आजारी, ह्दयरोगी, गर्भवती महिला, बाळंतिणींना हे त्रासदायक ठरत आहे. डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून सवलत मिळविण्यासाठी काहीजण जोरदार प्रयत्न करीत असल्याचे कारवार जिल्ह्यात सध्या दिसून येत आहे. मुंदगोड, हल्याळ, भटकळ आदी दूरच्या तालुका स्थळावरून कारवार जिल्हा इस्पितळात येऊन जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्रमाणपत्र मिळविणे अनिवार्य आहे. 

Tags : Karnataka, Election, Duty, Officer,