Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Belgaon ›

मुद्रांकांवर निवडणूक आयोगाची नजर!
 

मुद्रांकांवर निवडणूक आयोगाची नजर!
 

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:49AMबेळगाव  :  प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार साहित्याची छपाई करणार्‍या प्रेसवर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. नियमबाह्य छपाई करणार्‍याला सहा महिन्याचा कारावास आणि दंड याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मुद्रकांचे धाबे दणाणले आहेत.निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता राज्यात लागू करण्यात आल्यामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून छपाई करणार्‍या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

प्रचार साहित्याची छपाई परवानगी घेऊन करावी लागणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही जाती, धर्माचा उल्लेख करून मानहानीकारक मजकूर छापता येणार नाही. त्याचबरोबर लोकांना भडकावणारा मजकूरदेखील लिहिता येणार नाही. कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक निंदानालस्ती, टीका करणेदेखील गुन्हा ठरणार आहे. पत्रकाच्या खालील भागात मुद्रकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक,  प्रति यांची नोंद करणे बंधनकारक आहे. निवडणूक अधिकार्‍याची परवानगी घेऊनच याची छपाई करण्यात यावी.

छपाईच्यापूर्वी दोन साक्षीदारांसमोर अपेंडिक्स-ए मध्ये माहिती नमूद करून घेण्यात यावी. छपाईनंतर अपेंडिक्स-बी अर्जामध्ये माहिती दाखल करून बिल तयार करण्यात यावे. त्यावर मुद्रकाचा शिक्‍का, सही आवश्यक आहे. याची माहिती संबंधित मतदारसंघाच्या अधिकार्‍याकडे पोहोच करणे बंधनकारक आहे. निवडणूक निरीक्षक, अधिकारी यांना कोणत्याही प्रेसची तपासणी करण्याचा अधिकार आहे. ते कधीही प्रेसची तपासणी करू शकतात. मुद्रक दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्याची शिक्षा व दंड ठोठावण्याची तरतूद आहे. निवडणूक आयोगाच्या अटीमुळे मुद्रक हवालदिल बनले असून व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


Tags : Belgaon, Election, Commission, eye,  press