Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Belgaon › स्त्री अर्भक जिवंत पुरण्याचा प्रयत्न

स्त्री अर्भक जिवंत पुरण्याचा प्रयत्न

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:13AMबेळगाव : प्रतिनिधी

शहापूर स्मशानभूमीत सोमवारी दहाजणांच्या टोळक्याकडून दोन महिन्याचे स्त्री अर्भक जिवंत पुरण्याचा प्रयत्न स्मशानभूमीतील जागरूक कर्मचार्‍याने हाणून पाडला. भरदुपारी घडलेल्या या अघोरी प्रकाराने बेळगाव शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

शहापूर स्मशानभूमीत नेहमीप्रमाणे रखवालदार व अन्य एक कर्मचारी कार्यरत होते. सकाळी 11.30 वाजता दोघे दुचाकीवरून येऊन आपल्या नातेवाईकांचे दोन महिन्यांचे अर्भक केएलई दवाखान्यात मृत झाले आहे, असे सांगून अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्याची विनंती केली. यानंतर कर्मचार्‍यांकडून खड्डा खोदेपर्यंत इतर आवश्यक साहित्य खरेदी करून घेऊन येण्यास सांगितले. यानंतर केवळ अर्ध्या तासातच त्या लोकांनी अर्भकाला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत खड्ड्याजवळ आणले. त्यांच्यासोबत सुमारे दहा पुरूष व एक महिला होती. 

दरम्यान, जमिनीवर ठेवण्यात आलेले कपड्यातील अर्भक हालचाल कर असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले. यानंतर घातपात वा अघोरी प्रकार सुरू असल्याचा संशय बळावला. यानंतर कर्मचार्‍याने अधिक चौकशी केली. यावेळी संबंधितांकडून सदर अर्भकाचे ब्रेन हॅम्रेज झाले असून मृत झाल्याचा दावा करण्यात येत होता. सदर अर्भकावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते, असे सांगण्यात येत आले. याबाबत कर्मचार्‍यांनी स्मशानाबाहेर चारचाकी वाहनात बसलेल्या सुमारे 30 वर्षीय महिलेजवळ जाऊन विचारपूस केली. बाळ जिवंत आहे त्याला दूध द्या, अशी विनंती केली. यानंतर त्या महिलेने मी दोन दिवसांपासून दूध पाजविण्यासाठी बाळाला माझ्याकडे द्या म्हणून सांगत आहे. मात्र, माझे कोणीच ऐकत नाही,  असे सांगितले.

यानंतर मात्र कर्मचार्‍याने दफनविधी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्या दहा जणांच्या टोळीने तेथून काढता पाय घेतला. अन् काही अंतरावर जाऊन तीन चार तास तेथेच ती टोळी घुटमळत राहिली. सायंकाळी चारच्या सुमारास संबंधित पुरूष परिसरातून गायब झाले. हा सारा प्रकार पहाता, घातपात की अघोरी प्रकार की अन्य काही? त्याबाबत अधिकच संशय बळावत आहे. ही स्मशानभूमी सोडून अन्य ठिकाणी त्या बालिकेचा दफनविधी पार पडला का, यामागे कोण कोण आहे, याचा तपास पोलिस घेणार का, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरितच आहेत. 

माझ्या बाळाला द्या की हो!

सदर अर्भक जिवंत असल्याचा दावा कर्मचार्‍याने करून बाहेर वाहनात बसलेल्या त्या महिलेकडे चौकशी केली. त्या महिलेच्या बोलण्यातून खरा प्रकार उजेडात येत होता. ‘माझ्या बाळाला दूध पाजविण्यासाठी माझ्याकडे द्या’ असे मी सांगत आहे. पण, ही माणसे माझ्याकडे बाळाला देत नाहीत, असे ती सांगत होती.