होमपेज › Belgaon › कष्टातून उभारलेल्या संसाराला अपघाताचे ग्रहण

कष्टातून उभारलेल्या संसाराला अपघाताचे ग्रहण

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 12:55AMबेळगाव : प्रतिनिधी

सकाळी हसतमुखाने मंडळी वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेर जातात, क्षणात एका अपघातात पाच कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो, होत्याचे नव्हते होते, मुलांच्या भविष्यात आई -वडिलांनी पाहिलेली स्वप्ने भंग पावतात.... अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबांसह नातेवाईक, मित्रमंडळी, संपूर्ण शहराबरोबर ग्रामीण भागही रविवारी दु:खाच्या सागरात लोटला. एकाच सहकारी सोसायटीमध्ये कार्यरत असणारे, नेहमी हसतखेळत असणारे  चौघे जीवलग काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे. घरच्या कर्त्यांना अपघाती मृत्यूने गाठले. त्यांच्या परिवाराच्या शोकाला पारावार राहिला नाही. मित्रमंडळी, सोसायटीतले सहकार सुन्‍न झाले आहेत. अजूनही ते पुरते सावरलेले नाहीत.भक्ती महिला सोसायटीचे मॅनेजर सुनील पाटील यांना तर अश्रू अनावर झाले.  सोमवारी पहाटे चार वाजता मृतदेह बेळगावात पोहचले. बेळगाव, बाळेकुंद्री, बोकमूर, अष्टे व जुने बेळगाव येथे सोमवार 9 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत मृतदेहावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पकंज किल्लेकर : घरकुलाचे स्वप्न अधुरे

भक्ती महिला सोसायटीमध्ये सुरुवातीला पंकज पिग्मी कलेक्टर म्हणून कार्यरत होते. नंतर सात महिन्यापूर्वी  वसुली पदावर नेमणूक झाली होती. स्वकष्टातून त्याने प्रगती साधत शिवाजीनगर येथे स्वमालकीचे घरकुल बांधावयाचे काम हाती घेतले होते. दीड वर्षापूर्वी विवाह होऊन सहा महिन्याची मुलगी आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहित भाऊ आहे. घरकुल पूर्ण झालेले पाहण्याआधीच काळाने त्याला हिरावून नेले. 

मोहन रेडेकर : कुंटुंबाचा आधारवड हरपला

भक्ती सोसायटीचे कोर्ट कामकाज स्वतंत्ररीत्या सांभाळणारा, शांत स्वभाव, कधीही कुणाशी भांडण नाही. पितृछत्र पूर्वीच हरपले आहे. आईचे एक वर्षापूर्वी निधन. कुंटुंबाची जबाबदारी मोहनवरच होती. त्याच्या जाण्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नागेंद्र गावडे : मुलगी पाहावयास गेला असता तर

नागेंद्र गावडे हा अविवाहित होता. शांत स्वभावाचा, हुल्लडबाजी करणे त्याच्या रक्तातच नव्हते. तो उपवर असल्याने त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम रविवारी होता. कदाचित रविवारी घरच्यांचे ऐकून मुलगी पाहायला गेला असता तर वर्षा पर्यटनाचा बेत रद्द होऊन प्राण वाचले असते. त्याच्या पश्चात आई- वडील, विवाहित भाऊ असा परिवार आहे. गेल्या आठ वर्षापासून तो भक्ती सोसायटीमध्ये कार्यरत होता.

यल्लाप्पा पाटील : संसाराचा आधारवड हरपला

सोसायटीच्या स्थापनेपासून यल्लाप्पा पाटील वसुली पथकात कार्यरत होता. प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेत होता. गावात समाजकार्यात त्याचा सहभाग असे. आई -वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तो संसाराचा गाडा चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, लहान भाऊ आहे. 

किशन मुकुंद गावडे : कारकीर्द फुलण्याआधी शेवट

किशन मुंकुद गावडे पंडित नेहरु कॉलेजमध्ये कॉमर्सचे शिक्षण घेत होता. एकुलता एक चिरंजीव. सहकार क्षेत्रात अप्रत्यक्ष तो कार्यरत होता. जीवनात काही वेगळे करण्याची ऊर्मी त्याच्या अंगी होती. कारकीर्द  फुलण्याआधीच काळाने घाला घातला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.