Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Belgaon › पेट्रोल पंपावर दक्षता अनिवार्यच

पेट्रोल पंपावर दक्षता अनिवार्यच

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 7:44PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावमध्ये पेट्रोल पंपवर इंधन भरणार्‍या बॉक्सला आग लागल्याची घटना घडली. अतिवेगाने पेट्रोल पदार्थ पेट घेतो. यावेळी अग्निशमन दल अथवा पोलिसांना माहिती न देताच आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंददेखील करण्यात आली नाही. आग लागल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर या दृश्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले. पंपावर खबरदारी घेण्याची  अनिवार्यता अधोरेखित झाली आहे. इतर पंपचालकांनी आताच जागे होऊन उपाययोजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत. 

आगीपासून बचाव करण्यासाठीची यंत्रणा पेट्रोल पंपसारख्या ठिकाणी उपलब्ध हवी. आग लागल्यानंतर त्याची तीव्रता पाहून विझविण्यासाठी लागलीच प्रयत्न झाले पाहिजेत. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या प्रत्येकाला आग विझवण्याचे प्रात्यक्षिक दाखवावयास हवे. किमान वर्षातून दोनवेळा आग विझविण्याचे प्रात्यक्षिक कर्मचार्‍यांना द्यावयास हवे. बेळगावात पेट्रोल पंपावर आग लागल्याची घटना घडल्यानंतर ती विझविण्यासाठी मोजकेच लोक प्रयत्न करीत होते. त्यापेक्षा जास्त नागरिक आग लागलेले चित्रीकरण करण्यात मग्‍न असल्याचे मोबाईलवर पाहावयास मिळाले. आपण काय करतो, याचे भान त्याना राहिले नाही, ही खेदाची बाब आहे.

प्रशिक्षण हवे 

आगीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या खासगी कंपन्या आहेत. त्या औद्योगिक वसाहतीत वर्षातून दोन वेळा कर्मचार्‍यांना आग लागल्यानंतर पहिल्यांदा काय करावे, आग विझविण्यासाठीची यंत्रणा कशी वापरावी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येते. तशी प्रात्यक्षिके शहरातील पंपावरील  कर्मचार्‍यांना द्यायला हवीत.

आगीचे प्रकार

आगीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. कागद, लाकडाला लागलेली आग, तेलाला लागलेली आग, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्कीटने लागलेली आग. प्रत्येकाचे तंत्र वेगळे असते. यासाठी फायर एक्झिक्युटर, एबीसी या तीन प्रकारात वापरता येते. 

अग्निशमन दलाला पाचारण

आग लागल्यानंतर आगीचे स्वरुप पाहून नागरिकांनी निर्णय घ्यायचा असतो. आग विझविण्यासाठी प्राथमिक प्रयत्न अपुरे पडले तर अग्निशमन दलाला पाचारण करावे.

तीन कंपन्या कार्यरत

बेळगावात हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल पेट्रोलियम अशा तीन कंपन्या कार्यरत आहेत. दोन महिन्यातून एकदा पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आग विझविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

आग लागण्याची कारणे

पेट्रोलपंपावर मोबाईलवर संभाषण करताना आग लागू शकते. यासाठी मोबाईल वापरास बंदी आहे. प्लास्टिक बाटलीमध्ये पेट्रोल भरता काम नये. कारण प्लास्टिकचा संपर्क पेट्रोलशी आला तर आग लागू शकते.