Sun, Jul 21, 2019 01:41होमपेज › Belgaon › निपाणीत वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम

निपाणीत वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 14 2018 12:56AMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणीतील जुना पी. बी. रोडवरील अतिक्रमण हटले... रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगसाठी आरेखन झाले.... पण वाहतूक कोंडीचा समस्या नित्याचीच आहे. वाहनधारकांचे मनमानी पार्किंग प्रवाशांना डोकेदुखीच बनली आहे. नेहमी वर्दळीच्या असणार्‍या बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. सदर समस्या निकालात काढण्याचे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
शहरात वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल बनत चालला  आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणार्‍या पार्किंगमुळे व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे. पोलिस खात्यासमोर सुरळीत वाहतूक व सम-विषम तारखांना पार्किंग व्यवस्था करण्याचे आव्हान आहे.

निपाणी बसस्थानकासमोरून चिकोडी-मुरगूड रोड व बेळगाव-कोल्हापूर रोड जातो. या दोन्ही  मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुचाकींचे मोठ्याप्रमाणात पार्किंग करण्यात येते. मनमानी आणि विस्कळीतपणे नियम धाब्यावर बसवून पार्किंग होत असल्याने समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. सम-विषम तारखांना  पार्किंग व्यवस्थेचे नियोजन झाल्यास हा प्रश्‍न काही प्रमाणात निकालात निघू शकतो.
दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर
निपाणी शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.परिसरातील विविध खेड्यातून बाजार, बँक काम, नोकरदार आणि शासकीय कामांसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आठवडी बाजारादिवशी नागरिकांना चालत जाणेही मुश्किल बनत आहे. बसस्थानक परिसर, निपाणी नगरपालिका, अशोकनगर भागात  मनमानी पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे.

निपाणीतील हायटेक बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था असताना ते अपुरे पडत आहे. परिसरातील हॉटेल्स, छोटे व्यावसायिक यांच्यामुळे रस्त्यावरच  पार्किंग करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातच फिरते विक्रेते रस्त्यावरच थांबून असतात. मुख्य रस्ता 60 फुटाचा असला तरी एक वाहन जाणेही मुश्किल होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
सिग्‍नल शोभेची वस्तू शहरात अपुरे पोलिस बळ असल्याने वाहतूक समस्या निकालात काढण्यासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा नाही. निपाणी  पालिकेने ध. संभाजीराजे चौकात बसविलेला सिग्नल शोभेची वस्तू बनून राहिला आहे. त्यासाठी प्रशासनाने रहदारी पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढती समस्या लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने वाहतूक समस्या निकालात काढण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Tags : traffic crisis, the headache, continued,belgaon news