Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Belgaon › ‘लकवा’वरून अधिकारी धारेवर

‘लकवा’वरून अधिकारी धारेवर

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:26AMबेळगाव : प्रतिनिधी

दरवर्षी बेळगाव शहराच्या स्वच्छतेवर 40 कोटी रुपये खर्चूनही नाले-गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ होत नसल्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियाचा  शहरवासीयांना सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेलाच लकवा मारला असून, ‘पुढारी’ने यावर प्रकाश टाकल्यानंतर गुरुवारी आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर म्हणाल्या, मनपा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात रोगराई निर्माण झाल्यामुळे मनपालाच लकवा मारल्याची परिस्थिती उद्भवल्याचे वर्णन करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव मनपाची अब्रू शहराच्या वेशीवर टांगली गेली आहे. या प्रकाराला फक्‍त अधिकारी जबाबदार आहेत.

शहरात रोगराई निर्माण झाली, तरी मनपा आरोग्य विभाग सुस्तच असल्याने ‘पुढारी’मधून मनपालाच लकवा मारला आहे का? अशी कडवट टीका झाली आहे. त्यामुळे मनपाची उरलीसुरली अब्रूही गेल्याची खंत किरण सायनाक यांनी व्यक्‍त केली. मनपा आरोग्य विभागानेे शहरात कोणतीच रोगाची साथ उद्भवू नये, यासाठी आता तरी प्रभावी उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी केली.

आरोग्य विभाग सुधारणार?

मनपा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरामध्ये सुमारे दोन हजार लोकांना चिकुनगुनिया व डेंग्यूची लागण झालेली आहे. तरीही मनपा आरोग्य विभागाने गटारी व नाल्यांवर डास निर्मूलनासाठी औषध फवारणीचे काम हाती घेतलेले दिसून येत नाही. मनपाने सर्वच वरदहस्त शहरातील स्वच्छता कंत्राटदारावर ठेवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची टीकाही सदस्यांनी बैठकीत केली.

डेंग्यूग्रस्तांची वाढती संख्या

जुने बेळगाव, वडगाव, आनंदगर, भारतनगरमध्यडेंग्यू, चिकनगुणियाचे दोन हजारांवर रुग्ण आहेत. त्यात नगरसेवक रवी धोत्रे यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. हा मुद्दाही आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. तरीही उपाययोजनांना सुरवात न झाल्यामुळे नगरसेवकही आक्रमक झाले होते.

आजपासून उपाय

आरोग्याधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा यांच्यावर साथींच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. गुरुवारी उपाययोजनांना सुरवात झालेली नसली, तरी शुक्रवारी साथग्रस्त भागात फॉगिंग केले जाईल, असे सांगण्यात आले.